चंद्रपूर : उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडलीय. राधाबाई घुटके असं या महिलेचे नाव आहे.
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव भागातील आलेसूर इथल्या राधाबाई शनिवारी गावातल्या महिलांसह तेंदुपाने तोडणीसाठी गेल्या होत्या. त्यानंतर सर्व महिला घरी परतल्या मात्र राधाबाई परतल्या नाहीत.
त्यांच्या कुटुंबीयांनी या संदर्भात पोलीस आणि वनविभागाकडे तक्रार केली. दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पेंढरी जंगलातील पायवाटेवर राधाबाई यांचा मृतदेह आढळला.
त्यांच्या मृतदेहावर वन्यजीवांच्या हल्ल्याचे कुठलेही व्रण नसल्याने त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय.
शनिवार आणि रविवार चंद्रपूरमध्ये ४५ अंशांवर तापमान होते. त्यामुळे उन्हात काम केल्याने राधाबाईंचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय.
तर, वादळी वाऱ्यामुळे शेतातून जाणारी विजेची तार पडून तारेला स्पर्श झाल्याने १३ प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना बीडमध्ये घडलीय.
महावितरणची मुख्य तार पडल्याने काळविटासह १३ वन्यजीवांचा मृत्यू झाला. शिरूर तालुक्यातील नागरेवाडी इथल्या एका ऊसाच्या शेतात ही तार पडली होती. त्याचा शॉक लागून रात्रीच्या वेळी शेतात असलेल्या एका काळवीटासह ३ मुंगुस, १ रानडुक्कर, २ खार, १ रानमांजर, साप, उंदीर, यांना प्राण गमवावा लागला.