विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद: संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पैठणमध्ये यंदा दुष्काळामुळे मोठी विपरीत परिस्थिती ओढावली आहे. येथील गोदावरी नदीच्या पात्रात स्नान करून पुण्य मिळवण्याच्या आशेने आलेल्या भाविकांना यंदा निराश मनाने परतावे लागत आहे. कारण, पुण्य मिळवण्याचा हा मार्ग सुद्धा दुष्काळाने बंद केला आहे.
दुष्काळामुळे गोदावरीचे पात्र आता पुर्णपणे आटले आहे. त्यामुळे गोदेच्या काठावर होणारे धार्मिक विधी जवळपास बंद पडले आहेत. पात्रात थोडेफार पाणी आहे. मात्र, तेदेखील खराब झाल्याने याठिकाणी स्नान करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
मात्र, काहीजण या परिस्थितीचाही फायदा घेऊन गोदावरीचे पाणी विकण्याचा व्यवसाय करताना दिसत आहेत. यासाठी गोदावरी नदीच्या पात्रात अनेक जिरे खोदण्यात आले आहेत. जिरे म्हणजे नदीकाठी एक खड्डा ज्यात नदीत खोलात असलेलं पाणी झिरपंत, या जिऱ्यांमधून गावकरी नदीचं पाणी काढतात आणि गोदाकाठी ही पाण्याची बादली पाच ते दहा रुपयांना विकत मिळते. भाविकांनाही आता या विकतच्या पाण्याशिवाय कुठलाही आसरा उरला नाही.
याठिकाणी भाविक धार्मिक विधींसाठी येतात. तेव्हा कुटुंबातील एखादी व्यक्ती एक बादली पाणी विकत घेऊन स्नान करते. यानंतर धार्मिक विधी उरकले जातात. मात्र, पाणी मिळवण्यासाठी नदीपात्राता खोदण्यात आलेल्या या जिऱ्याच्याही क्षमता मर्यादित आहेत. त्यामुळे अनेकांना गोदावरीत स्नान करणाऱ्यांची संख्या आपसूकच कमी झाली आहे.
दुर्दैवाचा हा फेरा येथेच थांबत नाही. एखाद्याच्या मृत्यूनंतर करण्यात येणाऱ्या धार्मिक विधीसाठी इथं हजार रुपयांचा टँकर विकत घ्यावा लागतो, तो सुद्धा नदीपात्रातच उपलब्ध होतो. यंदाच्या दुष्काळाने जायकवाडी धऱणानेही तळ गाठला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे भाविकांच्या सोयीसाठीही नदीपात्रात पाणी ठेवणे शक्य नाही. परिणामी पापांचे क्षालन करण्याचा हा मार्गही दुष्काळाने बंद करून टाकला आहे.