Happy Anniversary Deccan Queen : तब्बल १७ डब्बे जोडून ही रेल्वे घाटांतून धावत सुटते

ही रेल्वे गेली ९० वर्ष मुंबई - पुण्याच्या प्रवाशांच्या दिमतीला आहे

Updated: Jun 1, 2019, 02:29 PM IST
Happy Anniversary Deccan Queen : तब्बल १७ डब्बे जोडून ही रेल्वे घाटांतून धावत सुटते title=

निलेश खरमरे, झी २४ तास, पुणे : पुणे - मुंबई - पुणे दरम्यान धावणारी सर्वांचीच आवडती लाडकी 'दख्खनची राणी' अर्थात डेक्कन क्वीन एक्सप्रेस आज ९० व्या वर्षात पदार्पण करत आहे. म्हणूनच मोठ्या जल्लोषात, थाटामाटात तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पुणे रेल्वे स्थानकावर डेक्कन क्वीन येताच बँड वादनाने सलामी देण्यात आली. प्रवाशी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी केक कापून आनंद व्यक्त केला. नेहमीच्या नियोजीत वेळेनुसार सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी 'दख्खनची राणी' मार्गस्थ झाली.


'दख्खनच्या राणी'चा बर्थडे

डेक्कन क्वीन ही अनेक प्रवाशांसाठी जणू दुसरं घरच बनले आहे.  ९० वर्ष डेक्कन क्वीन प्रवाशांच्या दिमतीला आहे. डेक्कन क्वीनचा इतिहासदेखील मोठा आहे. १ जून १९३० रोजी डेक्कन क्वीनने आपला पहिला प्रवास सुरु केला. डेक्कन क्वीन ही पहिली 'सुपरफास्ट डिलक्स ट्रेन' म्हणून ओळखली जाते. सुरुवातीला तिला केवळ सात डबे होते. नंतर त्यांची संख्या वाढवून १२ करण्यात आली....आणि आता तब्बल १७ डब्बे जोडून ही रेल्वे धावते. 


'दख्खनच्या राणी'चा बर्थडे

या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे, ही भारतातील एकमेव अशी गाडी आहे, जिला डायनिंग कार आहे. म्हणजेच चालत्या गाडीत हॉटेलसारखे बसून खाण्याची सोय आहे. पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास करणारी ही गाडी दोन्ही शाहरांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. कित्येक वर्षे डेक्कन क्वीनने दररोज पुणे - मुंबई - पुणे प्रवास करणारे प्रवासी आहेत.