कोल्हापूर : प्रकरण थोडे खाजगी आहे. पण, न्यायालयासमोर आल्याने ते सामाजिक झाले. तब्बल ९ वर्षे एकत्र संसार झाला असतानाही न्यायालयाने कोल्हापूरच्या एका जोडप्याचा विवाहच रद्दबादल ठरवला. या कालावधीत जोडप्यामध्ये एकदाही शरीरसंबंध (सेक्स) झाला नसल्याच्या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. विवाहाच्या मंगल अक्षता डोक्यावर पडल्यापासून जोडपी आनंदाने नव्या आयुष्याला सुरूवात करतात. पण, या दोघांची सुरूवात लग्न झाल्याच्या दिवसापासून कायदेशीर लढाईने झाली. कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेत फसवून आपलयाशी लग्न करण्यात आले हा या जोडप्यातील महिलेचा दावा. हा दावा करत महिलेने हा विवाहच रद्द करावा अशी मागणी न्यायालयाकडे केली होती.
न्यायाधीश मृदुला भाटकर यांच्या पीठासमोर या खटल्याची सुनावनी झाली. या प्रकरणाचा अभ्यास करून निर्णय देताना न्यायालयाने म्हटले की, संबंधीत महिलेसोबत फसवणुकीने लग्न केल्याचा कोणताही पुरावा नाही. मात्र, या जोडप्यात शरीरसंबंध झाल्याचाही कोणाताही पुरावा मिळत नाही. पती-पत्नीच्या नात्यामध्ये लैंगिक संबंध हे अत्यंत महत्त्वाचे उद्दीष्ट असते. पण, असे संबंध आले नाही तर, उद्दीष्ट पूर्ण होत नाही. विवाहानंतर एकदा जरी शरीरसंबंध आले तरीसुद्धा त्यातून विवाहाच्या उद्दीष्टाची पूर्तता होते. मात्र, या प्रकरणता तसे काहीच दिसत नाही. त्यामुळे हा विवाह रद्दबादल ठरवण्यात येत असल्याचा निकाल न्यायालयाने दिला.
दरम्यान, या प्रकरणात पती आणि पत्नी विवाहानंतर एकही दिवस एकत्र राहिले नाहीत. पण, पतीने मात्र पत्नीशी शरीरसंबंध झाल्याचा दावा केला होता. परंतू, या दाव्याची पुष्टी करताना न्यायालयात त्याला एकही पुरावा सादर करता आला नाही. त्यामुळे पुराव्याअभावी विवाहाच्या उद्दीष्टाची पूर्तता झाली नसल्याचा महिलेचा दावा योग्य असल्याचा निकाल न्यायालयाने दिला.
दरम्यान, लैंगिक संबंधाबाबत दावा करतना आमच्यात पती पत्नी म्हणून शरीरसंबंध झाले होते. त्यातून पत्नी गर्भवतीही राहिली होती, असा दावा पतीने केला होता. दरम्यान, दोघांतील मतभेदावार आपसात तोडगा काढावा असा सल्ला न्यायालयाने उभयतांना दिला होता. पण, त्यांच्यात तोडगा निघाला नाहीच. उलट दोघेही एकमेकांवर दोषारोप करत राहिले. त्यामुळे यापुढेही हे असेच चालत राहिले तर, दोघांच्याही आयुष्यातील अनेक वर्षे अशीच वाया जातील असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले. या निरिक्षणासोबतच न्यायालयाने दोघांचा विवाह रद्द ठरवला.
दरम्यान, या जोडप्याचा विवाह २००९मध्ये झाला होता. त्यावेळी मुलाचे वय २४ तर, मुलीचे वय २१ इतके होते. सत्र न्यायालयाने या प्रकरणात पतीच्या बाजूने निकाल दिला होता.