Sharad Pawar : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) महाराष्ट्राच्या राजकारणाचं रान पेटवलंय. जरांगे यांनी सरकारला 25 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तर अल्टिमेटम संपल्यानंतरचं आंदोलन सरकारला (Maharastra Politics) परवडणारं नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी आधीच दिलाय. त्यामुळे आता सरकार नेमका कोणता निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा माढा-पंढरपूर दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली होती. त्यावरून मराठा समाजाने थेट पवारांनाच इशारा दिलाय.
मराठा समाजाच्या इशाऱ्यामुळेच शरद पवारांनी सोलापूर दौरा रद्द केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केलाय. शरद पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. मात्र अचानक त्यांनी हा दौरा केला होता. इंडिया आघाडीच्या बैठकीचं कारण त्यासाठी देण्यात आलं होतं. मात्र शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आले असते तर सभा उधळवून लावली असती, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला. तसंच शरद पवारांच्या आजच्या दौऱ्याचा बोध घेत सरकारने बोध घ्यावा असा सल्लाही मराठा आंदोलकांनी दिलाय.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या माढ्यातल्या सभेत मराठा आंदोलकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. एका कार्यकर्त्याने अजित पवारांना काळं कापडही दाखवलं. तसंच एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजीही करण्यात आली. माढातल्या पिंपळनेरमध्ये विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रम होता. मात्र मराठा क्रांती मोर्चाने अजित पवारांच्या या दौऱ्याला विरोध केला होता. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावबंदी करण्याचं आवाहन केलंय. त्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसतायत. तर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार, असा पुनरुच्चार अजित पवारांनी केलाय.
मनोज जरांगेंनी नेत्यांना गावबंदी केल्यानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. लातूरमध्ये मराठा आंदोलकांनी क्रीडामंत्री संजय बनसोडेंचा ताफा अडवला. उदगीर तालुक्यातील वाढवाणा पाटी इथून क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी त्याचा ताफा अडवत जोरदार घोषणाबाजी केली. गावबंदी असताना तुम्ही गावात का आलात?, असा जाब मराठा कार्यकर्त्यांनी विचारला. क्रीडामंत्री संजय बनसोडेंना काळे झेंडेही दाखवण्यात आले. याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता.