Sharad Pawar On Ajit Pawar : अजित पवार यांचा मोठा गट शिंदे फजणवीस सरकारमध्ये सामील झाला आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवारांनी वयाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांवर थेट हल्लाबोल केला होता. साहेब वयाची ऐंशी वर्ष झाली, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता. याच वयाच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांनी अजित पवार यांना टार्गेट केले आहे. माझं वय काढाल तर महागात पडेल असे म्हणत शरद पवार यांनी थेट जाहीर सभेत अजित पवार यांना ठणकावले आहे.
राष्ट्रवादीतल्या बंडानंतर शरद पवारांनी आज पहिली जाहीर सभा घेतली ती छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात. यावेळी केलेल्या भाषणात पवारांनी येवलेकरांची माफी मागितली. माझा अंदाज चुकला म्हणून माफी मागतो, अशा शब्दांत छगन भुजबळांचं नाव न घेता त्यांनी जोरदार चपराक लगावली. वय झाल्यानं निवृत्त होण्याचा सल्ला देणा-यांनाही त्यांनी चांगलंच फटकारलं. बाकी काहीही टीका करा चालेल मात्र वैयक्तिक आणि वयाची टीका खपवून घेणार नाही. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. मी वयाच्या 92 वर्षापर्यंत लढणार असल्याचे यापूर्वीही शरद पवार यांनी म्हंटले आहे.
ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ या अटलबिहारी वाजपेयींच्या काव्यपंक्ती म्हणत शरद पवारांनी अजित पवार गटाला जोरदार उत्तर दिलंय. कामाला वयाचं बंधन नसतं त्यामुळे काम करत राहणार, 3 राज्यांचा दौरा करत वस्तूस्थिती मांडणार असं शरद पवारांनी म्हंटलंय. प्रफुल्ल पटेलांना 10 वर्ष मंत्रिपद दिलं, राज्यसभेवर उमेदवारी दिली याची आठवणही त्यांनी करून दिली. तसच सर्व बंडखोरांचा पराभव होईल असं पवारांनी म्हंटलंय.
आमचे 50 आमदार सत्तेच्या लालसेपोटी आलेले नाहीत. मंत्रिपदं येतात-जातात आम्हाला सत्तेचा मोह नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. राष्ट्रवादीच्या शपथविधीनंतर शिंदे गटात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. तर दुसरीकडे शरद पवारांचं वय सांगून कार्यकर्ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायेत मात्र त्यांना सहानुभूती मिळणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हंटल आहे.