Sharad Pawar On PM Modi Comment About His Family: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे संस्थाप शरद पवारांवर त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख करत केलेल्या टीकेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. पंतप्रधान मोदींनी एका मुलाखतीमध्ये पवार कुटुंबाचा उल्लेख करत शरद पवारांना त्यांचं कुटुंब संभाळता आलं नाही ते महाराष्ट्र काय संभाळणार अशी टीका केली होती. त्यावरुनच शरद पवारांनी आता उत्तर दिलं आहे. मोदींनी तरी स्वत:चं कुटुंब कुठे संभाळलं? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीला पंतप्रधानांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना शरद पवारांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना, मोदींनी, "शरदरावांसंदर्भात बोलायचं झाल्यास त्याची समस्या ही राजकीय नाही. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला हे कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी लोकांना ते कसं पटणार?" असा सवाल उपस्थित केला. पुढे बोलताना मोदींनी, "ही (शरद पवारांसंदर्भातील समस्या) पूर्णपणे त्यांची कौटुंबिक समस्या आहे. हा पूर्णपणे घरातील वाद आहे," असा दावाही मोदींनी केला. "काम करणाऱ्या पुतण्याला वारसा द्यायचा की मुलीला? त्यामुळे सहानुभूतीऐवजी असा प्रश्न पडतो की जे या वयात कुटुंबाला संभाळू शकत नाही ते महाराष्ट्राला काय संभाळणार?" असा टोला शरद पवारांनी लगावला.
मोदींनी केलेल्या या टीकेवरुन पवारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नावर शरद पवारांनी खोचक प्रतिक्रिया नोंदवली. "मलाही म्हणता येईल की त्यांनी कुठं कुटुंब संभाळलं. पण त्या नियमाने मी जाऊ इच्छित नाही. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर ती अतिशय चिंताजनक आहे. पण असं व्यक्तिगत बोलू नये. ते प्रत्येकाने पाळलं नाही. आपण ते पाळण्याची भूमिका योग्य आहे," असं शरद पवारांनी या टीकेवर प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं.
मोदींबद्दल लोकांमध्ये नाराजी असल्याचंही शरद पवारांनी म्हटलं आहे. "त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. त्यात प्रत्यक्ष कृतीत आणल्या नाहीत. त्यांचा स्वभाव बेछूटपणे बोलण्याचा आहे. काही झेपायचं नाही. सरकारच्या बाबतीत शिकायचं नाही, कशावर यतकिंचितही विश्वास न ठेवता स्वयंमप्रकारे अनेक गोष्टी करतात. विशेष म्हणजे 2014 ला त्यांनी जनतेचा संवाद अनेक गोष्टींमध्ये वाढला. अनेक ठिकाणी त्यांनी सरकारच्या निर्णयांवर टीका केली. आज तेच निर्णय मोदीसाहेब घेतात. हा विरोधाभास लोकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मोदींबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे," असंही शरद पवार म्हणाले.
"मनमोहन सिंग यांचे दहा वर्ष आणि त्यांची दहा वर्ष अशी तुलना करतात. मनमोहन सिंग यांचं वैशिष्ट्य होतं. शांतपणाने, गाजावाज न करता काम करणं आणि रिझल्ट देणं. मोदीसाहेबांचं रिझल्टचं माहिती नाही. पण त्याची चर्चा, टीका टीप्पणी यामध्ये जास्त वेळ जातो. लोकांना समजतं की हे फार खरं नाही," असंही शरद पवार म्हणाले.
उद्धव ठाकरे आपले शत्रू नसून त्यांना काहीही मदत लागली तर त्यांच्या मदतीला धावणारी पहिली व्यक्ती आपण असू असं पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणालेत. याचसंदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी, 'त्यांनी लाख म्हटलं असेल. पण आमची प्रार्थना ही आहे की उद्धव ठाकरेंना यांची मदत घ्यायची वेळ येऊ नये,' असा टोला लगावला.