नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे ठामपणे सांगणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अखेर 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या मुहूर्तावर कार्यकर्त्यांच्या मागणीला होकार दिल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी झालेल्या चर्चेअंती शरद पवार लोकसभा निवडणूक लढवण्यास राजी झाल्याचे समजते. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पवारांनी माढ्यातून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला होता. यावर पवारांनी विचार करू, असे सूचक उत्तर दिले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष पवारांच्या निर्णयाकडे लागले होते. मात्र, यांसदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
दरम्यान, या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, दिल्लीत बुधवारी शरद पवार आणि राहुल गांधी यांची बैठक झाली. त्यावेळी राज्यातील जागावाटपाबाबत चर्चा झाली. यावेळी जवळपास सर्व जागांवर एकमत झाले आहे. मात्र, उर्वरित जागांबाबत निर्णय घेण्यासाठी आणखी एक बैठक होईल. येत्या चार ते पाच दिवसांत आम्ही लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करू. यावेळच्या निवडणुकीत राज्यात आघाडीचे ३५ खासदार निवडून येतील, असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.
शरद पवार यापूर्वी २००९ मध्येही माढातूनच लोकसभेवर निवडून गेले होते. २००९ पासून २०१९ पर्यंत माढा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. २००९ मध्ये माढ्यातील जनतेने पाच लाख ३० हजार मते पवारांच्या पारड्यात टाकली होती. मात्र, भाजपने पवारांविरोधात तुल्यबळ उमेदवार दिल्यास यंदा पवारांना एवढी मते मिळतील की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.