शरद पवार यांची आजच्या दिवशी संसदीय कारकिर्दीला झाली होती सुरुवात

गेली ५४ वर्ष शरद पवार हे संसदीय राजकारणात असून 22 फेब्रुवारी 1967 रोजी त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली होती. 

Updated: Feb 22, 2021, 05:50 PM IST
शरद पवार यांची आजच्या दिवशी संसदीय कारकिर्दीला झाली होती सुरुवात  title=
Pic Courtesy: NCP

मुंबई : देशाच्या राजकारणात आजही एका नावाचा दबदबा कायम आहे, तो म्हणजे शरद पवार. (Sharad Pawar) गेली ५४ वर्ष शरद पवार हे संसदीय राजकारणात असून 22 फेब्रुवारी 1967 रोजी त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली होती. त्यानंतर 54 वर्ष सलग ते कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य राहिलेले आहेत. महाराष्ट्राचे (Maharashtra) चार वेळा मुख्यमंत्री, देशाचे सरंक्षणमंत्री, कृषीमंत्री अशी पदेही त्यांनी भूषवली आहेत. याचीच आठवण राष्ट्रवादीकडून (NCP) आज करून देण्यात आली आहे.

देशातील सर्वात वरिष्ठ आणि ज्येष्ठ असलेले राजकारणी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे पाहीले जाते. 80 व्या वर्षात देखील राष्ट्रीय राजकारणात सक्रीय असलेले शरद पवार हे एकमेव राजकारणी आहेत. शरद पवार यांनी पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली तेव्हा त्यांचे वय अवघे 27 वर्ष एवढे होते. 

बारामतीसारख्या दुष्काळी भागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना दिली होती. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात त्यांनी काम केले. देशातील सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री होण्याचा मानही शरद पवार यांच्याकडेच आहे. मागच्या 54 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक संघर्षाचे प्रसंग आले. 

पवार यांची राजकीय कारकिर्द संपली अशा प्रकारच्या अफवा देखील अनेकदा उठल्या. विरोधकांकडून तसे प्रयत्नही झाले, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. मात्र जनतेशी जोडलेली घट्ट नाळ शरद पवार यांना राजकारणातून बाद करु शकली नाही. याची झलक 80 व्या वर्षात देखील 2019 च्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत दिसली. भाजपची जोरदार चर्चा असतानाही 105 आमदारांच्या पक्षाला विरोधात बसविण्याची किमया पवार यांनी करुन दाखवली आहे, असे राष्ट्रवादीच्या अधिकृत पेजवर म्हटले आहे.