दर्शनासाठी शिर्डीला जात असाल तर दलालांपासून दूर राहा अन्यथा...

दुकान, हॉटेल आणि लॉजवर भक्तांना घेऊन येणाऱ्या दलालांना अवाजवी कमिशन दिलं जातं

Updated: Jul 10, 2019, 06:09 PM IST
दर्शनासाठी शिर्डीला जात असाल तर दलालांपासून दूर राहा अन्यथा...  title=

प्रशांत शर्मा, झी २४ तास, शिर्डी : शिर्डीत साईभक्तांची लूट सुरू आहे. भक्तांना लूटणाऱ्या अशाच १२ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. देश-विदेशातून लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. पहिल्यांदा शिर्डीत आलेल्या भक्तांना मंदिर कुठे आहे? रुम कुठे आहे? पूजा साहित्य आणि प्रसाद कुठे घ्यावा? याबाबत काहीही माहिती नसते. याचाच फायदा घेऊन शेकडो तरुणांनी 'कमिशन एजंट'चा धंदा सुरू केला.

मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने हे दलाल साईभक्तांना भुलवतात. झटपट आणि सुलभ दर्शन करून देण्याच्या बहाण्याने हे दलाल भक्तांना सोबत नेतात. मात्र यानंतर साईभक्तांना वेगळाच अनुभव येतो. भक्तांकडून अतिरिक्त पैसे उकळले जातात. हार, प्रसादासाठी अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याचा आरोप भक्तांनी केलाय. भक्तांना लुटणाऱ्या अशाच १२ दलालांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात, अशी माहिती शिर्डीचे उप-पोलीस निरीक्षक सोपान गोरे यांनी दिली.

शिर्डीत प्रसाद, हार विक्रीची अनेक दुकाने आहेत. मात्र यांत वस्तूचे दर ठरवलेले नाहीत. दुकान, हॉटेल आणि लॉजवर भक्तांना घेऊन येणाऱ्या दलालांना अवाजवी कमिशन दिलं जातं. त्यामुळे शिर्डीत कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचा धंदा सुरू झालाय.

यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी साई संस्थान, नगरपंचायत आणि पोलिसांची आहे. आता दलालांवर झालेल्या या कारवाईनंतर इतर दलालांचं धाबं दणाणलंय. ही कारवाई अशीच सुरू राहावी, अशी मागणी होतेय.