माणसांनाच नव्हे, देवांनाही 'कोरोना'चा धसका

देवाक् काळजी रं....!   

Updated: Mar 5, 2020, 08:22 PM IST
माणसांनाच नव्हे, देवांनाही 'कोरोना'चा धसका title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : साईनगरी शिर्डी, विठूरायाचं पंढरपूर, महादेवाचं त्र्यंबकेश्वर आणि अंबाबाईचं कोल्हापूर या सर्व देवस्थानांनी सध्या धसका घेतला आहे तो म्हणजे कोरोना corona  व्हायरसचा. देश-विदेशातून इथं भाविक दर्शनासाठी येतात, ज्यामुळं कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सगळ्याच देवस्थानांनी खबरदारीचे उपाय आखायला सुरूवात केली आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात गुरूवारपासून दर्शनाला येणारे भाविक आणि पुरोहितांनाही मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. संस्थानच या मास्कचा पुरवठा करणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करण्याचं कामही सुरू झालं आहे. 

जगभरात भीतीचं वातावरण पसरवणाऱ्या या कोरोनामुळं शिर्डीतही चिंतेचं वातावरण आहे. इथं स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे. शिवाय आवश्यकता भासल्यास साईबाबा रुग्णालयात एक स्वतंत्र कक्ष तयार करण्याची तयारीही साई संस्थाननं केली आहे. 

पंढरपूरच्या श्री विट्ठल रुक्मिणी मंदिरात कोरोनामुळं दिवसातून सहा ते सात वेळा स्वच्छता केली जात आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी रोज मोठ्या संख्येनं भक्तगण येतात. त्यांनी मास्कचा वापर करावा, असे फलकही पंढरपुरात लावण्यात आले आहेत. आळंदीच्या संत ज्ञानेश्वर मंदिरातही भाविकांना मास्क दिले जाणार आहेत. तसंच मंदिर प्रशासनानं वैद्यकीय पथकही तैनात केल्याचं कळत आहे. 

वाचा : 'Corona virusचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही भारतीय पद्धत वापरा' 

तर, तिथे कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवस्थान समितीनं तर खबरदारीचा उपाय म्हणून मंदिराच्या चारही दरवाजावर सॅनिटायझर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांना कोणत्याही व्हायरसची लागण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.