नाताळमध्ये साई दर्शनासाठी शिर्डी संस्थानाची नवी नियमावली

नव्या नियमांसह घेता येणार दर्शन 

Updated: Dec 20, 2020, 10:53 AM IST
नाताळमध्ये साई दर्शनासाठी शिर्डी संस्थानाची नवी नियमावली  title=

मुंबई : नाताळच्या सुट्ट्यांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन साई दर्शनासाठी संस्थानाने (Shirdi Sanstha New Rules) नवी नियमावली जारी केलीय. गर्दीच्या काळात दर्शन पास काऊंटरवर मिळणार नाही. साई भक्तांना संस्थानाच्या वेबसाईटवर पास आरक्षित करावा लागणार आहे. मार्गदर्शक सूचनांचं पालन करून गर्दीच्या काळात जास्तीत जास्त १२००० साईभक्तांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देणे शक्य होणार आहे. सशुल्क दर्शनपास आरक्षण केल्यापासून ५ दिवस आणि मोफत दर्शनपास आरक्षण तारखेपासून दोन दिवसांसाठी उपलब्ध असेल. 

नाताळ सुट्ट्यांसाठी साई संस्थानची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाईन पासशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.  संस्थानच्या वेबसाईटवरून दर्शन पास घेणे अनिवार्य असणार आहे. दररोज १२ हजार भाविकांना प्रवेश देणे शक्य होणार असल्याचं म्हटलं आहे. 

लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेले शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर राज्य सरकारच्या आदेशानंतर पाडव्याच्या मुर्हूतावर भाविकांसाठी खुले करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मंदिरामध्ये एका दिवसात दररोज सहा हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ दिला जात होता. त्यानंतर दररोज साधारणपणे आठ ते नऊ हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा, यादृष्टीने शिर्डी संस्थानने नियोजन सुरू केले होते. त्याप्रमाणे आता शिर्डी संस्थानने नाताळकरता नवी नियमावली जाहीर केली आहे.