अकोला : पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला जोरदार फटका बसून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे स्थानिक पक्षांशी युती करण्यावर भाजपचा प्रयत्न दिसून येत आहे. शिवसेना - भाजप युती होणार की नाही, याची चर्चा सुरु असताना आता भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे विधान केलेय. शिवसेनेने नाही म्हटले तरीही आम्ही शेवटपर्यंत युतीचे प्रयत्न करणार असल्याचे दानवे म्हणालेत.
रावसाहेब दानवे अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होतेय. दानवे आज लोकसभेच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यासाठी अकोल्यात आले होते. मात्र, भाजप हतबल नाही. भाजप कोणाच्या धमक्यांना घाबरणारही नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला इशाराही दिलाय.
शिवसेना आणि इतर मित्रपक्षांसोबत जागावाटपाची कोणतीही चर्चा झालेली नाही. जागावाटपाचा प्रश्न सर्वांच्या एकत्रित बैठकीत ठरवणार असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, लोणीकरांच्या जमीन बळकावल्याचं प्रकरण वर्तमानपत्रातून वाचलं असून त्याची चौकशी करू, असं दानवे म्हणालेत. चांगलं काम करीत राहणे हे आपलं काम असल्याचं सांगतांना त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये असण्याबाबत भाष्य करणे टाळले.
दरम्यान, शिवसेनेने भाजपकडे युतीचा प्रस्ताव सादर केल्याचे वृत्त होते. मात्र, हा प्रस्ताव भाजपला मान्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेने जास्तीच्या जागा मागितल्या होत्या. मात्र, भाजप या जागा देण्यास राजी नाही. तसेच शिवसेनेने वारंवार जाहीर केलेय की, आम्ही स्वतंत्र आणि स्वबळावर लढणार आहोत. त्यामुळे शिवसेना - भाजप युतीबाबत अजूनही एकवाक्यता दिसून येत नाही. त्यामुळे युती होणार की नाही, याचीच चर्चा सुरु आहे.