Ranveer Allahbadia You Tube : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या वर्षीच युट्यूबच्या माध्यमातून कमाल काम करणाऱ्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणाऱ्या युट्यूबरचा सत्कार केला. यामधील एक नाव होतं ते म्हणजे रणवीर अल्लाहबादिया या युट्यूबरचं.
BeerBiceps अशी ओळख आणि युट्यूब चॅनलची लोकप्रियता असणाऱ्या या रणवीरवर नुकतंच एक मोठं संकट ओढावलं. गोव्यामध्ये गेलं असता तिथं आपण बुडता बुडता वाचलो असं त्यानं स्पष्ट केलं आहे. इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून नेमकं काय घडलं यावरून त्यानं पडदा उचलला.
गोव्याच्या अथांग समुद्रामध्ये रणवीर त्याच्या प्रेयसीसमवेत पोहत होता. तेव्हाच समुद्राच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि अचानकच पाणी वाढलं आणि या पाण्यानं या दोघांनाही बरंच आत ओढलं होतं.
घडल्या प्रसंगाविषयी सांगताना रणवीर लिहितो, 'आतापर्यंत सर्वकाही सुरळीत होतं. पण, काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास किंवा त्यादरम्यान मला अक्षरश: एका मोठ्या प्रसंगातून वाचवण्यात आलं.' नाताळच्या दिवशी रणवीरनं ही पोस्ट लिहिली.
आपल्याला महाकाय समुद्रात पोहण्याची आवड फार आधीपासूनच असून फार कमी वयापासून आपण ही आवड जोपासत असल्याचं रणवीरनं सांगितलं. पण, 24 डिसेंबरला मात्र गोव्यातीलस समुद्रात पोहताना याच समुद्रानं जवळपास त्याचा घात केला होता. जवळपास 10 मिनिटं धडपड केल्यानंतर मदत मागण्यापूर्वीच तो बेशुद्ध होऊ लागला होता. तिथंच जवळ पोहणारं एक कुटुंब त्याच्या बचावासाठी धावलं.
'सहज समुद्राच्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घ्यायचा होता पण यात पाण्याच्या अनपेक्षित लोटानं व्यत्यय आणला. पुढे मला काहीही लक्षात असेल तर ते म्हणजे पोहण्यासाठीचा आमचा संघर्ष. एक क्षण असाही आला जिथं मी समुद्राचं पाणी पित होतो आणि माझं भान हरपू लागलेलं. त्या क्षणी मी मदतीसाठी आरडाओकडा करण्याचं ठरवलं.' असं लिहित रणवीरनं आयपीएस अधिकारी आणि त्यांच्या आयआरएस अधिकारी पत्नीचे आभार मानले.
आपल्या जीवनाील हा क्षण दोघांचंही मन सुन्न करणारा होता असं त्यानं प्रेयसीचं नाव आणि चेहरा जगासमोर न आणता सांगितलं. इतकंच नव्हे, तर या संकटातून बचावल्याप्रकरणी त्यानं कृतज्ञताही व्यक्त केली. सोशल मीडियावर सध्या रणवीरनं लिहिलेल्या या पोस्टची बरीच चर्चा होत असून, त्याची प्रेयसी कोण? हाच प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जात आहे.