शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत तरे यांचं निधन

शिवसेना नेते अनंत तरे यांचं निधन झालं आहे. तरे यांच्यावर मागील ३ महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. ते शिवसेनेकडून ठाणे

Updated: Feb 22, 2021, 06:39 PM IST
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत तरे यांचं निधन

ठाणे : शिवसेना नेते अनंत तरे यांचं निधन झालं आहे. तरे यांच्यावर मागील ३ महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचं सांगण्यात येतंय. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते शिवसेनेकडून ठाणे शहराचे माजी महापौर देखील होते. सतत तीन वेळेस महापौर राहण्याचा मान त्यांनी मिळवला होता,  विधान परिषदेवर २००० ते २००६ या काळात ते  शिवसेनेचे आमदार होते.  शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात अनंत तरे यांचे पक्षासाठी मोठे योगदान होते. ठाण्यात शिवसेनेची मोट बांधण्यास अनंत तरे यांचा मोठा सहभाग होता. पालघर जिल्ह्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात लोकउपयोगी कामं केली.

मुंबईच्या कोळी समाजातून होते, त्यांना मोठ्या प्रमाणात मानणारा बहुतांश कोळी समाज होता. महादेव कोळी समाजाला अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणींविरोधात अनंत तरे यांनी मोठी चळवळ उभारली होती. याबाबतीत ते सतत पाठपुरावा करत होते. जातपडताळणी समितीवर निवृत्त न्यायाधीश असावेत अशी देखील मागणी अनंत तरे यांनी लावून धरली होती. 

अनंत तरे हे महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्षपदी देखील होते. यामुळे महादेव कोळी समाजाच्या अनुसूचित जातीसाठी दिल्या जाणाऱ्या लढाला धक्का बसणार आहे. यामुळे कोळी समाजाचा ठाण्या वाघ गेला अशी प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे.