राज्यसभा निवडणुकीत मत बाद, सुहास कांदे आयोगाच्या विरोधात जाणार न्यायालयात

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत राज्यसभा निवडणुकीत बाद करण्यात आले. याविरोधात आता सुहास कांदे न्यायालयात जाणार आहेत.  

Updated: Jun 11, 2022, 01:15 PM IST
राज्यसभा निवडणुकीत मत बाद, सुहास कांदे आयोगाच्या विरोधात जाणार न्यायालयात title=

नाशिक : Rajya Sabha Election 2022 : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत राज्यसभा निवडणुकीत बाद करण्यात आले. याविरोधात आता सुहास कांदे न्यायालयात जाणार आहेत. त्यांनी कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. 

राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. महाविकास आघाडीचे तीन, भाजपचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. दुसरीकडे भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाल्यामुळे हा विजय म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे यश असल्याचे म्हटले जात आहे. 

दरम्यान, या निवडणुकमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने बाद ठरवल्यामुळे त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सुहास कांदे कायदेशीर लढा देणार आहेत.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर तसेच शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्याची मागणी भाजपाने केली होती. तर महाविकास आघाडीने भाजपाचे सुधीर मुनगंटीवार तसेच अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतावर आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. 

दरम्यान, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, भाजपचे सुधीर मुनगंटीवार, अपक्ष रवी राणा यांची मते वैद्य ठरवलीत तर शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत बाद केले. सुहास कांदे यांचे मत बाद झाल्यामुळे संजय राऊत यांना फटका बसण्याची शक्यता होती.  ते पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये काठावर पास झाले आहेत. त्यानंतर मला पाडण्याचा डाव होता, असा आरोप संजय राऊत यांनी केला. 

भाजपने आमिषं, केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन हा विजय मिळवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते संजय पवार यांना होती. मोठा विजय झाला वगैरे चित्रे भाजपने निर्माण केलंय पण असं काही नाही, असा टोला संजय राऊत यांनी मारला आहे. त्याचवेळी त्यांनी माझ्या पराभवाचा प्रयत्न झाला, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. त्यांनी नाव न घेता काँग्रेस, राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. तर शब्द देऊनही मत न देणाऱ्या अपक्षांची नोंद घेतली आहे, असे ते म्हणाले.