वय 75 वर्ष, उत्साह विशीतल्या तरुणासारखा; किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात आजीबाईंनी वेधले लक्ष

जय भवानी, जय शिवाजी... 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्या निमित्ताने रायगड किल्ल्याचा परिसर दुमदुमला. याच सोहळ्यात 75 वर्षांच्या आजाबाईंनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

वनिता कांबळे | Updated: Jun 6, 2023, 10:37 PM IST
वय 75 वर्ष, उत्साह विशीतल्या तरुणासारखा; किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात आजीबाईंनी वेधले लक्ष  title=

Shivrajyabhishek Din 2023 :  किल्ले रायगडावर 350वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला. या सोहळ्यासाठी लाखो शिवप्रेमी रायगडावर हजेरी लावली. या सहोळ्यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते रायगडावर उपस्थित असलेल्या 75 वर्षीय आजीबाईंनी. या आजीबाईंनी तरुणाच्या खांद्यावर बसून डान्स केला. 75 वर्ष वय असलेल्या या आजीबाईंचा उत्साह   विशीतल्या तरुणालाही लाजवेल. 

75 वर्षांच्या आजीबाईंचा खांद्यावर उभे राहून नाच

350 व्या शिव राज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर आलेल्या शिवभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. या उत्साहात 75 वर्षांच्या आजिबाईनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. होळीच्या माळावर शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिके सुरू असताना आजीबाईंनी तरुण शिव प्रेमींच्या खांद्यावर उभे राहून नाच केला.आजीबाईंचा हा नाच आणि जल्लोष तरुणांनाही लाजवणारा होता. सर्वांनीच या  आजीबाईंच्या उत्साहाचे कौतुक केले.

होळीच्या माळावर शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके 

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवभक्त मोठ्या संख्येने रायगडावर दाखल झाले होते. या निमित्ताने होळीच्या माळावर शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यामध्ये दांडपट्टा, लाठीकाठी, बाणाफेक, तलवार बाजी अशा एकाहून एक सरस चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थित शिवप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले. 

युवराज संभाजीराजे छत्रपती, शहाजीराजे, संयोगिता राजे  गडावर उपस्थित

या सोहळ्यासाठी लाखो शिवप्रेमी गडावर जमले होते. या सोहळ्याच्या निमित्तानं मेघडबरी आकर्षक फुलांनी सजविण्यात आली होती. ठिकठिकाणी भगवे झेंडे, विद्युत रोषणाई करण्यात आली. युवराज संभाजीराजे छत्रपती, शहाजीराजे, संयोगिता राजे  गडावर उपस्थित होते. शाहिरी पोवाडे आणि गीतांनी गडावर आलेले शिवप्रेमी रंगून गेले.

शिवराज्याभिषेक सोहळ्या दरम्यान राजमाता जिजाऊंची समाधी दुर्लक्षित

किल्ले रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक दिमाखात साजरा होत असताना रायगडाच्या पायथ्याशी असलेली राजमाता जिजाऊंची समाधी दुर्लक्षित राहिली आहे. कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च झाले पण जिजाऊंच्या समाधीवर पुष्पमाला देखील चढली नाही. डझनभर मंत्र्यांनी सोहळ्याला हजेरी लावली पण जिजाऊंच्या समाधीवर जावून दर्शन घेण्याची आठवण एकालाही झाली नाही, याबाबत शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला.