प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : हिंदवी स्वराज्याच्या निर्मिती नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजधानी म्हणून निवड केलेला ऐतिहासिक रायगड किल्ला... रायगडाची धूळ एकदातरी मस्तकी लावावी ही प्रत्येक शिवप्रेमीची इच्छा असते . त्यामुळे इतिहासाची साक्ष देणाऱ्या स्वराज्याच्या राजधानीत वर्षाच्या बारा महीने शिवप्रेमींची मोठी गर्दी असते. शिवाय शिवराज्याभिषेक सोहळा किंवा शिवपुण्यतिथीला लाखो शिवभक्त आवर्जून महाराजांच्या चरणी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरादेखील होत असतो. यापुढे रायगडावर कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही. तसंच किल्ला कायमस्वरुपी प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.
रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा होतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी, मावळे हजारोंच्या संख्येने दाखल होतात. भगवे झेंडे, भगव्या पताका, तोरणं, फुलं यांनी किल्ला सजलेला असतो. पारंपरिक वेशभूषा, वाद्यं, तुतारी, शंखनाद आणि जय भवानी-जय शिवाजीचा जयघोषाने आसमंत दुमदुमून जातो. त्यामुळेच ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरु झालीय. यावेळी शिवकालीन वास्तू पाहण्याची अनोखी संधी यावेळी शिवप्रेमींना मिळणार आहे.
किल्ले रायगडावर सध्या प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या संवर्धन कामाला वेग आलाय. छत्रपती संभाजीराजे रायगड संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष झाल्यानंतर होणारा पहिलाच राज्याभिषेक सोहळा असल्याने यंदा उत्सवाची मोठी तयारी करण्यात येतेय. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून देखावा देखील साकारण्यात येणार असल्याने सर्वांचेच लक्ष यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागलंय.