ताडोबात आढळला 'बघिरा', कॅमेऱ्यात कैद

या बिबट्याची जात मार्जारच... गुणसूत्रातल्या दोषांमुळे अशा पद्धतीचे रंगबद्दल होत असतात

Updated: May 23, 2018, 07:49 PM IST
ताडोबात आढळला 'बघिरा', कॅमेऱ्यात कैद title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : ताडोबामध्ये एक नवा पाहुणा आलाय.... हा पाहुणा पर्यटकांचं आकर्षण ठरणार आहे. "जंगलबुक'मधून घराघरांत पोहोचलेला हा बघिरा.... म्हणजेच काळा बिबट्या... पट्टेदार वाघांच्या हक्काच्या अधिवासात आता नवा पाहुणा आढळलाय.... चंद्रपुरातल्या ताडोबा अंधारी प्रकल्पात या काळ्या बिबट्याचा मुक्काम आहे... २२ मे रोजी मंगळवारी कोळसा वन परिक्षेत्रात शिवणझरी पाणवठ्यापाशी हा काळा बिबट आढळला. बेल्जीयमचे पर्यटक जीन फ्रँकॉईस आणि ज्युलिएट यांनी हा काळा बिबट्या सगळ्यात आधी पाहिला आणि त्याला कॅमेऱ्यात कैद केलं.

सफारीनंतर त्यांनी वनविभागाला या बिबट्याची माहितीही दिली... २०१४ साली ताडोबात काळा बिबट बछडा आढळल्याची नोंद आहे. मात्र आता या बिबट्याने जास्त काळपर्यंत दर्शन दिल्याने यावर शिक्कामोर्तब झालंय. 

या भागात पाणवठ्यावर मुबलक पाणी उपलब्ध असल्याने हा दुर्मिळ काळा बिबट पुन्हा याच ठिकाणी येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेत ताडोबा व्यवस्थापनाने या भागात आणखी कॅमेरा ट्रॅप लावलेत.

या बिबट्याची जात मार्जारच... गुणसूत्रातल्या दोषांमुळे अशा पद्धतीचे रंगबद्दल होत असतात. याआधी राज्याच्या काही भागात काळा बिबट आढळल्याची नोंद आहे. मात्र ताडोबातील नव्या पाहुण्याने ताडोबातलं वन्यजीव वैविध्य पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.... तसंच पर्यटकांसाठीही हे नवं आकर्षण ठरणार आहे.