कोल्हापूर : सरकार आणि प्रशासनाला इथल्या महापुराचं गांभीर्यच समजलं नाही, असं म्हणत शिरोळचे शिवसेना आमदार उल्हास पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. शिरोळ तालुका बुडतोय, जर मदत पोहोचली नाही तर ही जनता तुम्हाला माफ करणार नाही. लवकरात लवकर लष्कर, हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्याची मागणी त्यांनी केली आहे. डोळ्यांतून अश्रू ढाळत स्वतच्याच सरकारकडे त्यांनी मदतीची याचना केली आहे.
शेतकऱ्यांना आपल्या जीवाबरोबरच जनावरांचा जीवही तितकाच महत्वाचा आहे. घालवाड या शिरोळ जवळच्या गावाला पुरानं वेढा दिला आहे. गावातही प्रत्येक घरात पाणी शिरलं आहे. जनावरांना वाचवण्यासाठी त्यांना थेट घरांच्या टेरेसवर नेण्यात आलं आहे. २००५ च्या तुलनेत महापूर जास्त आहे. परंतु मदत तोकडी असून सरकारला शेलक्या शब्दात शेतकऱ्यांनी सुनावले आहे. शेतकऱ्यांचा राग यातून दिसतो आहे.