मेघा कुचीक, मुंबई : पालघर येथील एका केमिकल आणि अॅसिड ट्रेडिंग कंपनीत काम करणाऱ्या दाम्पत्यावर अॅसिड ओतून दुहेरी हत्या केल्याचं प्रकरण गेल्या काही दिवसांपूर्वी घडलं. सदर घटनेनंतर आरोपी गुड्डू यादव याला फाशीचा शिक्षा सुनावण्यात आली होती.
यादवनंच या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली ज्यानंतर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. त्याच्याविरुद्धच्या पुराव्यांमध्ये विसंगती असल्याच्या कारणावरून न्यायालयाने हा निर्णय दिल्याचे स्पष्ट केले आहे.
नेमकं काय घडलं होतं?
पीडित पती-पत्नी हे दोघे केमिकल आणि अॅसिड ट्रेडिंग कंपनीत काम करत होते. कंपनीच्या आवारातील एका खोलीत आपल्या कुटुंबासह राहत होते. अन्य दोन कर्मचारीही कंपनीच्या कार्यालयात झोपले होते.
एका रात्री, आरोपीने हे दाम्पत्य झोपेत असताना त्यांच्यावर सल्फ्यूरिक अॅसिड टाकले आणि तो पळून गेला. पीडित दाम्पत्याला लगेचच रुग्णालयात नेण्यात आले, पण तेथे आणल्यानंतर चार तासांतच पतीचा मृत्यू झाला आणि दुसऱ्या दिवशी पत्नीचाही मृत्यू झाला.
न्यायमूर्ती एसएस जाधव आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, खटला अत्यंत आकस्मिक पद्धतीने चालवला गेला. आरोपींना दोषी ठरवण्यासाठी पुराव्यांमध्येही विसंगती आढळली आहे. जोडलेल्या पुराव्याची गुणवत्ता आणि विश्वासार्हता आमच्या निरीक्षणानुसार देखील नाही. फिर्यादीच्या नेतृत्वाखालील पुरावे अतिशय विसंगतीपूर्ण आहेत, असे उच्च न्यायालयाने म्हटले.
परिणामी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा निकाल न्यायालयाने दिला.
खंडपीठाने असेही म्हटले की, आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, उलट आरोपीला केवळ संशय असल्याचा फायदा द्यायलाच हवा, नाही तर ती न्यायाची पायमल्ली होईल. न्यायालयाच्या या निर्णयाने ऐकणाऱ्यांना धक्काच बसत आहे पण, पुराव्याअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याची ही बाब स्वीकारावी लागेल हेच खरं.