'भाजपाने राणेंना उमेदवारी दिल्यास शिवसेना उमेदवार उभा करेल'

 शिवसेनेचा राणेंच्या भाजपा प्रवेशाला तीव्र विरोध 

Updated: Sep 18, 2019, 06:37 PM IST
'भाजपाने राणेंना उमेदवारी दिल्यास शिवसेना उमेदवार उभा करेल' title=

सिंधुदुर्ग : शिवसेनेचा राणेंच्या भाजपा प्रवेशाला तीव्र विरोध असल्याचे शिवसेना नेते दिपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. भाजपाने नितेश राणे यांना कणकवलीतून उमेदवारी दिली तर शिवसेना आपला उमेदवार उभा करेल आणि त्यांचा पराभव करेल असेही ते म्हणाले. राणेंना काल व्यासपीठावर घेतलं नाही याचा अर्थ भाजपा त्यांना प्रवेश इच्छूक नाही हे स्पष्ट असल्याचे ते म्हणाले. 

राणे नेहमी प्रवेश करणार म्हणतात पण त्यांना प्रवेश कुठे दिला गेलाय. त्यामुळे ते नेहमी प्रवेश करणार असे म्हणतायत. त्यांना चार तास वाट बघत थांबावं लागलं. एवढे आमचे मुख्यमंत्री पॉवरफूल आहेत. कणकवलीची जागा भाजपाकडे असते, उरलेल्या दोन जागा शिवसेनेकडे असतात. त्यामुळे उमेदवार आयात करण्याची अजिबात गरज नाही असे केसरकर म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय शिवसेनेशी विचारविनिमिय केल्याशिवाय राणेंना प्रवेश देणार नाही. त्यामुळे आता त्यांना उद्धव ठाकरेंच्या प्रतिसादाचीही वाट पहावी लागणार आहे. सध्या नारायण राणे वेटिंगमध्ये आहेत. नेता एवढा हतबल होतो तेव्हा आमचे भवितव्य काय ? असा विचार कार्यकर्ते विचार करतात. त्यामुळे काही दिवसांनी त्यांच्याबरोबर कार्यकर्ते शिल्लक राहणार नाहीत असा टोलाही केसरकर यांनी लगावला.