दिवंगत आर आर पाटील यांची कन्या स्मिता विवाहबद्ध

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या कन्येचा विवाह आज पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला.

Updated: May 1, 2018, 11:47 PM IST
दिवंगत आर आर पाटील यांची कन्या स्मिता विवाहबद्ध

पुणे : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटलांच्या कन्या स्मिता पाटील यांचा आज विवाह सोहळा पुण्यात पार पडला. या लग्नाचं विशेष म्हणजे, पाहुण्यांच्या स्वागताला अजितदादा होते, ते पाहुणे मंडळीची अगदी आपल्या मुलीचं लग्न असल्यासारखी विचारपूस करत होते. तर वधू कन्या सूमन पाटील भावनिक झाल्या होत्या, आज आर आर आबा पाहिजे होते अशी काहीशी त्यांची भावना होती, त्यांच्या भावनांना त्यांनी अश्रूतून वाट दिली असताना, त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भावनिक आधार देत सांत्वन केलं. 

आबांच्या पश्चात कन्येला राष्ट्रवादी कुटुंबाची साथ

हा नुसताच आर आर पाटील यांचा मुलीचा विवाह सोहळा राहिला नाही, तर आर आर पाटील यांच्या पश्चात राष्ट्रवादीचे बडे नेते आर आर पाटलांचं कुटुंब म्हणून स्मिता पाटील यांच्या कन्यादानाला उभे राहिल्यासारखे होते.

आज आर आर आबा पाहिजे होते

वधू-वरांना आशीर्वाद तसेच शुभेच्छा देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षातील नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पुण्यातील लक्ष्मी लॉन्स इथं हा सोहळा पार पडला. हा लग्नसोहळा आनंदाचा क्षण असला, तरी त्याला आबांच्या आठवणींची भावनिक किनार होती.

सुमन पाटील या काहीशा भावनिक

आर आर पाटलांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या मुलीचं लग्न होत आहे. अशावेळी त्यांच्या पत्नी सुमन पाटील या काहीशा भावनिक झाल्या होत्या. मात्र विवाहस्थळी उपस्थित असलेल्या खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांना जवळ घेत त्यांचं सांत्वन केलं. त्याचवेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी पुढे होते. एकूणच आर आर आबांच्या कुटुंबियांसोबत असलेला प्रत्येकाचा जिव्हाळा याक्षणी दिसून येत होता.

कोण आहेत आनंद थोरात?

हा विवाह मगरपट्टा सिटीतील लक्ष्मी लॉन्समध्ये सायंकाळी सात वाजता पार पडला. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांचे पुतणे आनंद थोरात यांच्याशी स्मिता पाटील यांचा विवाह पार पडला. या लग्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी घेतल्याचं समजतंय.आनंद यांनी परदेशातून शिक्षण पूर्ण केलं असून ते पुण्यात व्यवसाय सांभाळतात.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्ष स्मिता पाटील यांचा यापूर्वी शनिवारी ९ डिसेंबरला, आनंद थोरात यांच्याशी साखरपुडा झाला होता. तासगावमधील अंजनी गावात हा साखरपुडा होता. लग्न आज पुण्यात पार पडलं, लग्नाला राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.