Solapur Election Results 2024 Live : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी झाल्या आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी आमदार राम सातपुते यांचा केला दारुण पराभव केला आहे. गेल्या दोन टर्म पासून भाजपाच्या ताब्यात असलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ अखेर काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. गुलालाची उधळण करत सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.
सोलापूर हा तसा काँग्रेसचा गड.. सोलापूरचे खासदार सुशीलकुमार शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय ऊर्जामंत्री, लोकसभेचे सभागृह नेते अशी मोठी पदं भुषवली. मात्र, 2014 च्या मोदी लाटेत सुशीलकुमार शिंदेंचाही निभाव लागला नाही. 2019 मध्ये सलग दुस-यांदा सुशीलकुमार शिंदेंना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी , काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या मध्ये तिरंगी लढत झाली.. भाजपच्या डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी 5 लाख 24 हजार 985 मते मिळवत बाजी मारली. सुशीलकुमार शिंदेंचा 1 लाख 58 हजार 608 मतांनी दारुण पराभव केला होता. तर यावेळी वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना एक लाख 70 हजार मते मिळाली होती. प्रकाश आंबेडकरांमुळेच सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाल्याची चर्चा देखील यावेळी रंगली होती.
सोलापूरमध्ये यंदा मात्र हाय व्होल्टेज सामना रंगला. सुशीलकुमार शिंदेंऐवजी आता त्यांची लेक आणि विद्यमान आमदार असलेल्या प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवली. तर, भाजपनेही प्रणिती शिंदेंविरोधात राम सातपुतेंच्या रुपाने तगडा उमेदवार दिलाय. विधानसभेत आक्रमक चेहरा म्हणून राम सातपुतेंची ओळख आहे. उसतोड कामगाराचा मुलगा ते भाजप आमदार असा राम सातपुतेंचा प्रवास आहे. सोलापुरात आता तीन टर्म आमदार असणाऱ्या प्रणिती शिंदे यांच्याविरोधात एक टर्म आमदार असणाऱ्या राम सातपुते अशी लढाई रंगली.