'...तर कान धरुन मला काम सांगा', खासदार झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी हक्कानं दिली पहिली प्रतिक्रिया

प्रणिती शिंदे यांना 6 लाख 20 हजार 225 इतकी मतं मिळाली. तर राम सातपुते यांना 5 लाख 46 हजार 028 इतकी मतं मिळाली.  

Updated: Jun 5, 2024, 01:16 PM IST
'...तर कान धरुन मला काम सांगा', खासदार झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी हक्कानं दिली पहिली प्रतिक्रिया title=

MP Praniti Shinde Reaction : सोलापूर लोकसभा मतदारसंघाला पहिली महिला खासदार मिळाली आहे. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार राम सातपुते यांचा दारुण पराभव केला. प्रणिती शिंदे यांना 6 लाख 20 हजार 225 इतकी मतं मिळाली. तर राम सातपुते यांना 5 लाख 46 हजार 028 इतकी मतं मिळाली. त्यामुळे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 74 हजार 197 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. "मला अजूनही विश्वास बसत नाही की मी खासदार झाले", अशी प्रतिक्रिया नवनियुक्त खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली. 

नवनियुक्त खासदार प्रणिती शिंदे यांनी विजयाचा गुलाल उधळत प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्या म्हणाल्या, "सोलापूरकर मी तुमचे उपकार कधीच विसरु शकणार नाही. सोलापूरसाठी बघितलेले स्वप्न पूर्ण करणे हे माझं कर्तव्य आहे. सोलापूरच्या 42 डिग्री तापमानात माझा कार्यकर्ता राबला. त्यामुळे मी तुमचे उपकार कधीच विसरु शकत नाही." 

"हुकुमशाहीचा पराभव झाला"

"निवडणुकांच्या काळात थोडा राग येतो, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागते. पण आता यानंतर मात्र मी माझा स्वभाव सुधारण्याचा प्रयत्न करेन. शिंदे साहेबांनी मला छडी दिली आहे. ते म्हणत होते उमेदवाराला नाहीतर मोदींना मत द्या. सोलापूरला भाजपकडून जातीपातीची कीड लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात हुकुमशाहीचा पराभव झाला", असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले.  

"महाविकासआघाडीतील सर्वच पक्षाने एकमेकांना साथ दिली आणि त्याचा निकाल आला. 400 पार वाल्यांनी हे पाहावं की ही आमची ताकद आहे. मी काम करण्यासाठी कमी पडणार नाही, पण जर कमी पडत असेन तर कान धरुन मला काम सांगायचं", असेही प्रणिती शिंदेंनी म्हटले. 

चला पुन्हा एकदा कामाला लागू या

जितना बडा संघर्ष उतनी शानदार जीत, असं मला नेहमीच वाटतं. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ मतदारसंघातील नागरिकांचे खूप खूप आभार. मी माझा हा विजय शिंदे साहेबांच्या संघर्षाला अर्पित करते. तसेच सर्वांचे आभार मानते आणि सर्वांना सांगते की चला पुन्हा एकदा कामाला लागू या, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

पहिल्या महिला खासदार

दरम्यान सोलापूर लोकसभा मतदार संघात सुशीलकुमार शिंदे यांना दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. तर 2004 साली प्रणिती शिंदेंच्या आई उज्वला शिंदेंचा पराभव झाला होता. आता प्रणिती शिंदे यांनी भाजपचा पराभव करत वडिलांच्या पराभवाचा वाचपा काढला आहे. तसेच 1951 पासून सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकही महिला खासदार नव्हता. सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून म्हणजे 14 वेळा खासदार झाले होते, पण त्यामध्ये एकही महिला खासदार नव्हत्या. पण 2024 च्या निवडणुकीत सोलापूरकारांनी प्रणिती शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत इतिहास रचला आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x