Nana Patole News: देशात लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बहुमत मिळवलं आहे. तर, इंडिया आघाडीनेही जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यात काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं काँग्रेसच्या गटात आनंदाचे वातावरण आहे. महाविकास आघाडीला राज्यात जनतेने कौल दिला आहे. तर, काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट होताच राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. अशातच आता काँग्रेसने नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत बॅनरबाजी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत हॉर्डिंग लावले आहेत. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात असे होर्डिंग लावण्यात आले आहेत. यावर काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी, काँग्रेस नेते गिरीश पांडव यांचाही फोटो आहे. नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आल्याने राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.
भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात 25 वर्षानंतर काँग्रेस उमेदवार निवडून आला आहे. 2024 च्या निवडणूकीत काँग्रेसचा विजय झाला आहे. सुरुवातीला प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवखा उमेदवार म्हणून भाजपाने प्रचारात मुद्दा लावुन धरला होता. तर भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट सोबत असताना भाजपची ताकत वाढली असे चित्र होते. मात्र नाना पटोले यांनी आपल्या नेतृवात नवखा उमेदवार निवडून आणणार अस प्रण घेतला होता. अखेर मतमोजणीचा कल हाती येताच राजकारणाचा कुठलाही अनुभव नसलेल्या नवाख्या उमेदवारांनी विद्यमान खासदार यांना परभवाची धुळ चारली आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस हाच मोठा भाऊ ठरल्याने नाना पटोले यांचे राजकीय वजन वाढले आहे.