अहमद शेख, झी मीडिया, सोलापूर : खेळत खेळत शेततळ्याकडे गेलेल्या तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मोहोळ तालुक्यातील शेटफळ इथं घडली. या घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. विनायक भरत निकम (वय-11), सिद्धार्थ भरत निकम (वय-8, दोघे रा. माचणूर) तर कार्तिक मुकेश हिंगमिरे (रा. शेटफळ वय-5) अशी मृत्यु झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
मंगळवेढा तालुक्यात राहणारे भरत निकम हे आपल्या कुटुंबासह शेत मजुरीसाठी शेटफळ इथे आले होते. काल ही ते नेहमीप्रमाणे मजुरीसाठी शेतात गेले. आई-वडिल कामाला गेल्याने विनायक आणि सिद्धार्थ मामाचा मुलगा कार्तिकबरोबर खेळायला बाहेर पडले. खेळता खेळता दुपारी तीनच्या सुमारास ते शेततळ्याजवळ पोहचले.
शेततळ्याजवळ खेळत असताना तिघांचा पाय घसरला आणि एका मागोमाग एक शेततळ्यात पडले आणि तिघांचाही मृत्यू झाला.
संध्याकाळी आई-वडिल कामावरुन घरी आल्यानंतर मुलं घरात न दिसल्याने आई-वडिल कावरे बावरे झाले. त्यांनी आसपास शोध घेतला. पण त्यांना मुलं कुठेच दिसली नाहीत. म्हणून त्यांनी शेतात शोध घेतला असता शेततळ्याजवळ त्यांना मुलांच्या चपल दिसल्या. संशय आल्याने त्यांनी शेततळ्यात उतरुन पाहिलं असता तिनही मुलांचे मृतदेह दिसले.
मृतदेह पाहताचा आई-वडिलांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मोहोळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.