हूश्श! येत्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार, वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज

Maharashtra Monsoon: घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. मान्सून येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात धडकणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 11, 2023, 07:07 AM IST
हूश्श! येत्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार, वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज title=
Southwest monsoon will arrives in maharashtra in next 48 hrs

Maharashtra Monsoon:उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. हवामानात होत असलेल्या बदलामुळं येत्या ४८ तासांत मान्सून (Monsoon) महाराष्ट्रात धडकणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळं काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Monsoon In Maharashtra)

48 तासांत मान्सून धडकणार

८ जून रोजी केरळात मान्सून दाखल झाला आहे. त्यानंतर १६ जूनपर्यंत तळकोकणात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र हवामानात होत असलेले बदल आणि बिपरजॉय चक्रीवादळामुळं मान्सून त्याआधीच राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. अनुकूल हवामानामुळं पुढील ४८ तासांत महराष्ट्र, गोव्यामध्ये पावसाची बरसात होऊ शकते. नैऋत्व मान्सून आज पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील कारवारपर्यंत पुढे सरकला आहे. तर, पुढील ४८ तासांत मान्सून महाराष्ट्राच्या काही भागात तो आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. गोवा, केरळ, कर्नाटक व तळकोकणात ढगांची दाटी होताना दिसत आहे. ही मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती आहे. 

बिपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र होणार

 दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळामुळं मान्सून अधिक लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. बिपरजॉय चक्रीवादळ येत्या २४ तासांत अधिक तीव्र होणार आहे. त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीला जाणवू शकतो. मात्र, मुंबईला त्याचा फारसा धोका नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले असले तरी शनिवारी रात्री मुंबई शहर व उपनगर परिसरात सोसाट्याचा वारा सुटला होता. तसंच गिरगाव चौपाटीवर वाळूचे लोट उसळले असून समुद्राच्या लाटाही खवळल्या होत्या. 

कोकण किनारपट्टीला धोका

बिपरजॉय चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिमेस सुमारे ७०० किमीवर आणि मुंबईच्या नैऋत्येला ६३० किमीवर पुढे सरकले आहे. येत्या २४ तासांत ते आणखी तीव्र होऊन ईशान्येकडे सरकरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुजरात आणि कोकण किनारपट्टीला त्याचा परिमाम जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. केरळातील तिरुवअनंतपूरम, कोल्लम, पाथनमथिट्टा, अलापुझ्झा, कोट्टायम, इडुक्की, कोझिकोडे आणि कण्णूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तिथं केरळात मान्सूनही सुरु झाल्यामुळं आता या राज्याला पावसाचा तडाखा बसण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. 

कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्याच्या समुद्रातही उंच लाटा उसणार आहेत. वलसाड येथील तिथल किनाऱ्यावरही उंचच उंच लाटा उसळण्यास सुरुवात झाली. ही संपूर्ण परिस्थिती पाहता हा समुद्रकिनारा 14 जूनपर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.