SSC Exam: लग्नाला जायचं म्हणून बोर्डाच्या परीक्षेला पाठवलं मित्राला, पकडलेला मित्र आधीच दहावी नापास

SSC Exam: शिवपूरी येथील परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकाने एका दहावीच्या विद्यार्थ्याला पकडले.

Pravin Dabholkar | Updated: Feb 27, 2024, 01:46 PM IST
SSC Exam: लग्नाला जायचं म्हणून बोर्डाच्या परीक्षेला पाठवलं मित्राला, पकडलेला मित्र आधीच दहावी नापास title=
SSC Board Exam

SSC Exam: सध्या महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये दहावी-बारावीचे वातावरण आहे. ही बोर्डाची परीक्षा असल्याने विद्यार्थी, पालक परीक्षा जास्त गांभीर्याने घेतात. वर्षभर यासाठी अभ्यास केला जातो. चांगली शिकवणी लावली जाते. असे असले तरी ऐन परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांची एक गडबड वर्षभराच्या साऱ्या मेहनतीवर पाणी फेरते. कोणत्या ना कोणत्या परीक्षा केंद्रावर असा प्रकार समोर येतो. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या शिवपूरीमधून समोर आलाय. हा प्रकार ऐकून तुम्हाला रागही येईल आणि हसूदेखील येईल.या परीक्षेत कोणता कॉपीचा प्रकार समोर आला नाही. तर परीक्षा देणारा विद्यार्थीच वेगळा आला. बर आता परीक्षा द्यायला जो विद्यार्थी इतक्या आत्मविश्वासाने आलाय तर त्याला काहीतरी चांगल येत असावं, अशी पाठवणाऱ्याची अपेक्षा असते. पण तसं काही नव्हतं. परीक्षा देणारा विद्यार्थी आधीच दहावी नापास होता. हे ऐकून तर पर्यवेक्षकांनी डोक्याला हात मारुन घ्यायचाच बाकी होता. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

शिवपूरी येथील परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकाने एका दहावीच्या विद्यार्थ्याला पकडले. अमने  हा विद्यार्थी दुसऱ्याच्या हॉलतिकिटावर परीक्षा देत होता. पर्यवेक्षकाला याच्यावर संशय आला. त्याने अल्पवयीन विद्यार्थ्याची चौकशी केली. यानंतर घाबरलेला विद्यार्थी पटापट बोलू लागला. विशेष म्हणजे परीक्षा द्यायला आलेला हा विद्यार्थी स्वत: दहावी नापास आहे. 

परीक्षा हॉलमध्ये बसलेल्या परीक्षार्थीचा चेहरा आणि त्याच्या हॉल तिकिटावरील फोटो पाहून पर्यवेक्षकाला संशय आला. यावर त्याने विद्यार्थ्याला प्रश्न विचारले. फोटोतील विद्यार्थी आपणच आहोत, हे तो आत्मविश्वासाने सांगण्याचा प्रयत्न करु लागला. 

हॉल तिकिटवरील फोटो आणि प्रत्यक्षातील विद्यार्थी हे समीकरण जुळून येत नव्हतं. त्यात याआधीच्या पेपरला परीक्षा द्यायला दुसरा विद्यार्थी आला होता,असे शेजारच्या विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकांना सांगितले. त्यामुळे संशय अधिकच वाढला. 

गोंधळ वाढू नये म्हणून संशयित विद्यार्थ्याला खानापूर्ति पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेव्हा आपण मित्राच्या जागेवर परीक्षा देत असल्याचे  विद्यार्थ्याने सांगितले. 

आपल्या मित्राला एका लग्नाला जायचे होते. त्यामुळे मैत्री खातर आपण परीक्षा द्यायला आल्याचे विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले.