अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: एसटीने प्रवास करनाऱ्या प्रवाशांसाठी बांधण्यात आलेल्या प्रवासी निवारा हा घोड्याचा तबेला झाल्याचे चित्र अमरावती यवतमाळ मार्गावरील नांदगाव खंडेश्वर येथे दिसून येत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे एसटी प्रवासी बाहेर अन् घोडे हे प्रवासी निवाऱ्यात आसरा घेत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
लॉकडाउनच्या काळात सर्व शासकीय निमशासकीय स्तरावरील प्रवासी वाहतुक प्रशासनाने बंद केली होती. आता लॉकडाउन थोडे थोडे का होईना पण खुले होताना दिसत आहेत. अशातच शासनाने पुन्हा परिवहन महामंडळाच्या प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. ज्यात प्रवासी जिल्हा अंतर्गत व जिल्हा बाह्य सुद्धा प्रवास करू शकतात. पण या काळातही प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
स्वतः परिवहन महामंडळाचे कर्मचारी बस स्थानक परिसरात कार्यरत असून प्रशासनाने डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे. परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांकरिता थांबण्याची व्यवस्था करण्यात आली नसून आता प्रवासी निवासाच्या आत घोड्यांची संख्या दिसत असल्याने नाईलाजाने प्रवाश्यांना बस स्थानकाच्या बाहेरच उभे राहावे लागत आहे. ज्याने प्रवाश्यांची गर्दी दाटून येत असून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे.