एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यभरात प्रवाशांचे हाल

राज्यातील एसटी बससेवा 80 टक्के ठप्प झालीय. 

Updated: Jun 9, 2018, 04:56 PM IST

मुंबई : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिलेली एकतर्फी वेतनवाढ नाकारत राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता संपाचं हत्यार उपसलय. यामुळे राज्यातील एसटी बससेवा 80 टक्के ठप्प झालीय. राज्यातील विविध भागांमध्ये संपाचा परिणाम जाणवत आहे. नाशिकमधील ठक्‍कर्स बझार, महामार्ग, जुने सीबीएस बसस्थानकात बसेस जागेवरच उभ्या असल्यानं संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.  तर नागपूर विभागात आज 90 टक्के बस फेऱ्या बंद आहेत. ज्या मोजक्या बस फेऱ्या सुरू आहेत त्यात प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यात 95 टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

सेवा विस्कळीत 

 या संपामुळे एसटी सेवा विस्कळीत झाली असून प्रवाशांचे हाल होत आहेत. सिंधदुर्गातही दुसऱ्या दिवशी एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे कोकणात एस टी हेच प्रवाशांचे प्रमुख साधन असल्याने अनेकांचे मोठे हाल झाले आहेत. शिवसेनेची संघटना वगळता सर्व संघटना या संपत सहभागी झाल्यानं ९० टक्के एस टी वाहतूक बंद आहे. सिंधुदुर्गात एसटीच्या रोजंदारी ८४  कामगारांचं निलंबन करण्यात आलं आहे.