सरकारची पगारवाढ एसटी कर्मचाऱ्यांनी धुडकावली

सरकारनं देऊ केलेली पगारवाढ एसटी कर्मचाऱ्यांनी फेटाळलीय... त्यामुळं गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला एसटीचा संप आता चिघळलाय. काय आहेत यामागची कारणं आणि ही कोंडी फुटेल का? 

Updated: Oct 19, 2017, 07:45 PM IST
सरकारची पगारवाढ एसटी कर्मचाऱ्यांनी धुडकावली title=

मुंबई : सरकारनं देऊ केलेली पगारवाढ एसटी कर्मचाऱ्यांनी फेटाळलीय... त्यामुळं गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला एसटीचा संप आता चिघळलाय. काय आहेत यामागची कारणं आणि ही कोंडी फुटेल का? 

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सोडवण्यात परिवहनमंत्री सपशेल अपयशी ठरलेत. बुधवारी दिवसभरात संपकरी संघटना आणि सरकार यांच्यात चर्चेच्या १३ फेऱ्या झाल्या. चार ते सात हजारांची पगारवाढ देण्यास प्रशासन तयार होतं. त्यासाठी ११०० कोटींचा पगारवाढीचा प्रस्तावही पुढं करण्यात आला. पण एसटी कर्मचारी संघटनांनी ही ऑफर अमान्य केली.

संपाचा तिढा कायम

कर्मचारी संघटनांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळं परिवहनमंत्री हतबल झालेत. यापुढं एक रूपयाही वाढवून देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सरकार आणि एसटी कर्मचारी आपापल्या भूमिकेवर हटून बसल्यानं संपाचा तिढा कायम आहे. गेल्या तीन दिवसांत एसटीचं सुमारे ७० कोटींचं नुकसान झालंय. शिवसेना आणि भाजप यांच्यातल्या वादामुळं एसटी संप चिघळत चालल्याची चर्चा सुरू आहे. या संपामुळं ऐन दिवाळीत हजारो प्रवाशांचा खोळंबा झालाय.

सेनेची भूमिका काय?

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाच्या वेळी शिवसेनेनं विरोधाची भूमिका घेतली होती. त्यामुळं आता शिवसेनेचे परिवहनमंत्री अडचणीत आलेले असताना, भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्पा का? तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री पुढाकार का घेत नाहीत? बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी तातडीनं लक्ष घालणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता ऐन दिवाळीत राज्यातील जनतेला संपाचा त्रास होत असताना गप्प का? असा सवाल उपस्थित होतोय... शिवसेना आणि भाजपमधलं हे कुरघोडीचं राजकारण जनतेच्या मुळावर येतंय, एवढं नक्की...