एसटीचे बुकिंग आता दोन महिने अगोदरच; परिवहनमंत्र्यांची घोषणा

गणपती उत्सवासाठी २७ जुलै पासून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी 

Updated: Jul 24, 2019, 04:19 PM IST
एसटीचे बुकिंग आता दोन महिने अगोदरच; परिवहनमंत्र्यांची घोषणा title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: गणपतीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता एकाचवेळी दोन्ही बाजूंचे आरक्षण करणे शक्य होणार आहे. एसटीने त्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रवाशांना ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिल्याची घोषणा परिवहन मंत्री श्री. दिवाकर रावते यांनी केली. 

एसटी महामंडळाने यंदा मुंबई उपनगरातून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित बसेस व्यतिरिक्त २२०० जादा  बसेसची सोय केली आहे. या बसचे आरक्षण २७ जुलै (२६ जुलैच्या मध्यरात्रीपासून) सुरु होणार आहे. यंदा पहिल्यांदाच प्रवाशांना जाण्याच्या आणि परतीच्या प्रवासाचे एकत्रित आरक्षण उपलब्ध करून करून देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिली आहे. 

यापूर्वी ३० दिवस अगोदर एसटीचे बुकिंग करता येत होते. मात्र, आता परिवहन खात्याच्या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याला परतीच्या आरक्षणासाठी तिथल्या बसस्थानकावर ताटकळत उभे राहण्याची आता आवश्यकता उरणार नाही. २७ तारखेपासून सुरु होणाऱ्या या आरक्षण सुविधेमुळे जाण्याबरोबर परतीचे आरक्षण सुद्धा मिळाल्यामुळे त्यांचा गणपती उत्सवाचा आनंद द्विगुणित होणार आहे. 

सदर तांत्रिक बदल संगणकाच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये  करण्यासाठी आरक्षण प्रक्रिया २६ जुलै रोजी संध्याकाळी ४:०० ते मध्यरात्री ००:३० पर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण तिकिट काढणे अथवा रद्द करणे हि प्रक्रिया करता येणार नाही. २६ तारखेच्या मध्यरात्रीपासून सुधारित प्रणाली आरक्षणासाठी उपलब्ध असेल.