मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेली लस (Corona Vaccine) उद्यापासून म्हणजे १६ जानेवारी २०२१ पासून राज्यात कोरोना लसीकरण (States preparation give Covid-19 vaccine) मोहीम सुरु होत आहे. यासाठी सिरम इन्स्टीटयूटने तयार केलेली कोव्हीशिल्ड लस तसेच भारत बायोटेक या उत्पादकाने तयार केलेली कोव्हॅक्सीन लस देण्यात येणार आहे. या दोन्ही लसी सुरक्षित असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे.
● राज्याला कोव्हीशिल्ड व्हॅक्सीनचे ९.६३ लाख डोसेस व कोव्हॅक्सिन लशीचे २०,००० डोसेस प्राप्त झालेले असून ते सर्व जिल्हयांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत.
● भारत बायोटेककडून प्राप्त झालेली कोव्हॅक्सीन लस ही राज्यातील ६ ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामध्ये ४ वैद्यकीय महाविद्यालये व २ जिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे.
● केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. त्यानुसार नोंदणी झालेल्या सर्व शासकीय व खाजगी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे.
●सदर लसीचे २ डोस ४ आठवड्यांच्या अंतराने देण्यात येणार आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी शीतसाखळी अबाधित ठेवून लस, लसीकरणासाठी आवश्यक सामुग्री, AD Syringes तसेच AEFI Kit उपलब्ध आहेत. तसेच सर्व संबंधीत कर्मचा-यांना प्रशिक्षण ही देण्यात आले आहे.
● केंद्र शासनाकडून लसीचा पुरवठा सुरु झाला असून सध्या पुरवठा करण्यात आलेल्या डोसेस नुसार २८५ ठिकाणी व्हॅक्सीनेशन सेशनस आयोजीत करण्यात येत आहेत. प्रत्येक लाभार्थीला लसीचे २ डोस ४ ते६ आठवडयाच्या अंतराने देण्यात येणार आहे.
● टप्प्याटप्याने केंद्र शासनाकडून नोंदणी केलेल्या सर्व आरोग्य कर्मचा-यांसाठी आवश्यक असलेली लस पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व आरोग्य कर्मचारी या लसीच्या २ डोसने संरक्षित होणार आहेत. व यासाठी लसीचा साठा केंद्र शासनाकडून प्राप्त होणार आहे.
● नोंदणी केलेल्या सर्व शासकीय तसेच खाजगी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचा-यांनी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.