राज्यातील 14 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान 

Updated: Jan 15, 2021, 08:38 AM IST
राज्यातील 14 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

मुंबई : आज राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होतं आहे. धुळे जिल्ह्यात 36 तर नंदुरबार जिल्ह्यात 23 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अनेक गावांमध्ये थेट लढत आहे तर काही ठिकाणी तिरंगी लढत पाहण्यास मिळत आहे. यावेळेस डिजिटल प्रचारावर जास्त भर दिल्यामुळे मतदान किती होते ? आणि निकाल कसे लागतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Grampanchayat Election 2021)

या निवडणुकीत धुळे जिल्ह्यात 3228 उमेदवार निवडणूक रिंगणात आपलं नशीब आजमावत आहेत, यातून 1476 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. एक लाख 13 हजार मतदार या उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रामध्ये बंद करणार आहेत. जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

अमरावती जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीला सुरूवात झालीय. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यात ४,३९७ पदांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी ४७७ सदस्य आणि १३ ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध निवडून आलेत. निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १० लाख ४० हजार १५९ मतदार मतदान करणार आहेत. महिला आणि बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी गावातही निवडणूक होत आहे. सकाळी ८.३० वाजता ठाकूर कुटुंबासह मतदान करणार आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यातील 386 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होतंय.  386 ग्रामपंचायतीसाठी साडेसात हजार उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांचे भवितव्य आज ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या एकूण ग्रामपंचायती संख्या 433 असून त्या पैकी 47 ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या आहेत. आज एकूण 1 हजार 492 वार्ड मध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

नागपूरात १३० ग्रामपंचायतीसाठी निवडणुका होत असून १०८६ जागांवर प्रत्यक्ष मतदान होणार आहे. सुनील केदार यांचं गाव पाटण सावंगीतही मतदान होत आहे.

रायगड  जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होतं आहे. जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींसाठी हे मतदान होतं आहे. 612 जागांसाठी 1 हजार 588 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7.30 पासून ते संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.. निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. मतदान शांततेत पार पाडण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.