Monsoon Arrived in Maharashtra : राज्यातल्या काही भागाला वादळाचा तडाका बसला आहे. मनमाड शहरात वादळामुळे अनेक भागातील विजेचे खांब कोसळले. तसंच झाडंही उन्मळून पडलीत. वादळीवाऱ्यासोबत झालेल्या पावसामुळे साठवून ठेवलेला कांदा भिजलाय. नऊ ते दहा कांदा शेड वादळी वाऱ्यामुळे उडून गेले.. त्यामुळे शेकडो क्विंटल कांदा भिजला. साठवून ठेवलेला तसंच शेतात काढून ठेवलेला कांदा सावरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली.
हिंगोलीत केळीच्या बागा भुईसपाट
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याला वादळामुळे शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा भुईसपाट झाल्यात. अनेक घरांवरील पत्रे उडाल असून घरांसोबत लहान दुकानांचं मोठं नुकसान झालंय. तर कानोसा इथं विजेच्या तारा पडून शेतक-यांच्या पशुधनाचं नुकसान झालंय. केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यानं कृषी अधिकाऱ्यांनी ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केलीये.
नांदेडमध्ये पावसाची हजेरी
मान्सूनपूर्व पावसानं नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हजेरी लावली. काल दिवसभर कडक उन्हानंतर संध्याकाळी ढगाळ वातावरण निर्माण झालं. नांदेड सह बिलोली, धर्माबाद, नायगाव तालुक्यात पाऊस झाला. वादळी वा-यासह पावसाचं आगमन झालं. धर्माबाद तालुक्यात पावसाचा अधिक जोर होता. अचानक आलेल्या पावसानं अनेकांची धांदल उडाली.
बीडमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस
बीड जिल्ह्यातील अनेक भागांत काल सायंकाळपासून पावसानं हजेरी लावलीय. आष्टी, पाटोदा, गेवराई, शिरूर, कासार या भागात विजांच्या कडकडाटासह पावसानं दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात अजूनही ढगाळ वातावरण आहे. पुढील काही दिवस असाच पाऊस झाला पेरणीला सुरुवात होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यस्त करत आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये हलका पाऊस
पिंपरी चिंचवड शहरात मध्यरात्री पावसानं हजेरी लावली. गेले काही दिवस शहरात ढगाळ वातावरण होत होतं मात्र पाऊस काही पडत नव्हता. मध्यरात्री शहराच्या विविध भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण असून वातावरणात गारवा आहे. त्यामुळे आजही पाऊस पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.
पुण्यातल्या जुन्नरमध्ये मान्सून पूर्व पावसाने दमदार बॅटिंग केली. शिरूर,आंबेगाव, जुन्नरमधल्या अनेक गावांना रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपलंय. मान्सूनपूर्व पावसाने बळीराजा सुखावलाय. पेरणीच्या कांमाना आता आणखी वेग येईल. या पावसामुळे उकाड्याने हैराण झाल्याने झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय.