नागपूर : इयत्ता नववीत शिकणाऱ्या संचित संजय वाघमारे (वय-१४ वर्षे) नावाच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आईवडीलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
संचितच्या आई-वडीलांची कौटुंबिक स्थिती हालाकीची आहे. दोघेही मोलमजूरी करतात. त्यामुळे घरात आर्थिक टंचाई आणि भौतिक सुखाची भूक ही नेहमीचीच. पण, तरीही दोघे मागे हटत नाहीत. काहीही करायचे आणि परिस्थितीशी संघर्ष करायचा. गरीबीची बाजी पलटवून लावण्याचा दोघांचाही निर्धार. या निर्धारातूनच संचितला चांगले शिक्षण द्यायचे. त्याला स्वत:च्या पायावर उभे करायचे हे स्वप्न दोघांनीही उराशी बळगले होते. मात्र, त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.
गेल्या काही दिवसांपासून संचितने आईवडीलांकडे मोबाईलसाठी हट्ट धरला होता. पण, इच्छा असूनही परिस्थिती नसल्याने ते संचितला मोबाईल घेऊन देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्याच्या हट्टाकडे ते कानाडोळा करत असत. या प्रकारामुळे चिडलेल्या संचितने टोकाचे पाऊल उचलत घरातील सीलिंगला असलेल्या हुकात चादर अडकवून आत्महत्या केली. संचित हा नागपूरमधील सिंधी हिंदी शाळेचा विद्यार्थी होता.