जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच्या अवयादनातून दोघांना जीवनदान मिळणार आहे. नागपुरात आज अवयवदाना करीता ग्रीन कॉरिडॉर बनवण्यात आला तसेच शासकीय मेडिकल महाविद्यालय व रुग्णालयातील हे पहिलेच अवयवदान ठरले.
स्वप्नील पुरी यांच्या कुटुंबावर सध्या शोककळा पसरली आहे. स्वप्नील यांचे वडील सुभाष पुरी यांच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं. मात्र वडलांच्या मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या शरीरात अवयव रूपाने वडील जिवंत राहतील याचं त्यांना समाधान आहे.
नागपूरच्या कोंढाळी येथील ५८ वर्षीय सुभाष पुरी यांचा मंदिरात जात असताना जबर अपघात झाला.अपघातात सुभाष पुरी यांच्या डोक्याला जबर मार लागला. सुभाष यांना तातडीने नागपूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आले. नागपूरच्या विभागीय अवयवदान समितीने सुभाष पुरी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगत अवयवदानासाठी तयार केले. सुभाष पुरी यांना ११ डिसेंबरला शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले व आज (बुधवार) अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
सुभाष पुरी यांचं हृदय चेन्नईच्या तर यकृत पुणे येथील गरजू रुग्णाला देण्यात येणार आहे. अवयव वेळेत पोहचावे याकरिता यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांच्या साह्याने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता... यामुळे मेडिकलपासून विमानतळाचे हे अंतर ११ मिनिटांत पूर्ण करण्यास मदत झाली. दोन मुली व एक मुलगा असलेले सुभाष पुरी आज आपल्यात नाही मात्र जगातून जाताना कुटुंबीयांनी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे दोन रुग्णांना जीवनदान मिळाले व अवयव रुपात सुभाष पुरी जिवंत राहतील.