महाराष्ट्रातील हिगोली जिल्हा हळदीसह केळ्यांसाठीही प्रसिद्ध आहे. येथे केळ्यांच्या मार्केटमध्ये फार मोठी मागणी असते. पण केळींचा हंगाम आल्यानंतर त्याची मागणी कमी होते आणि अनेकदा शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतं. याला कंटाळूनच हिंगोली जिल्ह्याच्या खाजामपूरवाडी येथे एका तरुण शेतकऱ्याने केळींचे चिप्स बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. यानंतर त्याला चांगलं यश मिळालं असून, आता तो वर्षाला 30 लाखांची कमाई करत आहे. त्याने गावातील 6 बेरोजगार तरुणांनाही नोकरी दिली आहे.
उमेश मुके यांच्याकडे वडिलोपार्जित 8 एकर जमीन आहे. या जमिनीवर ते केळीची शेती करत होते. पण मागील काही वर्षांपासून केळीच्या बाजारात सतत येणारी मंदी आणि बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या नुकसानाला कंटाळून उमेशच्या वडिलांनी एक वर्षांपूर्वी केळीची शेती बंद केली. सतत शेतीत होणारं नुकसान आणि घराची बिघडणारी आर्थिक स्थिती यामुळे उमेशला 12 वी नंतर आपलं शिक्षण सोडावं लागलं आणि कुटुंबाला शेतात मदतीसाठी हात पुढे करावा लागला.
एकदा उमेशने युट्यूबवर केळींपासून चिप्स कसे तयार केले जातात याचा व्हि़डीओ पाहिला. यानंतर त्याने याचा उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याने शेतात पुन्हा एकदा केळीचं पिक घेतलं. पण ही केळी बाजारात विकण्यासाठी तर चिप्स बनवण्यासाठी होती.
उमेशने सुरुवातीला छोट्या पॅकेटमधून चिप्स विकण्यास सुरुवात केली. त्याने किराणा दुकान आणि स्वीट मार्टवर जाऊन मार्केटिंग केली. धीम्या गतीने मागणीत वाढ होऊ लागली आणि त्याने उद्योग वाढण्याचा निर्णय घेतला. उमेशने एका बँकेतून कर्ज घेतलं आणि गावात चिप्स बनवण्यासाठी कंपनी सुरु केली. त्याने कंपनीला आपल्या आईचं अन्नपूर्णा नाव दिलं.
उमेशच्या चिप्सची मागणी इतकी वाढली की, आता दरवर्षी 10 ते 12 टनच्या आसपास विक्री होत आहे. तो दरवर्षी या व्यावसायातून 30 लाखांची कमाई करत आहे. उमेशच्या चिप्सला नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम, बीड, यवतमाळ जिल्ह्यात मागणी आहे. हे चिप्स राज्यभरात प्रसिद्ध करण्याचा त्याचा प्रयत्न आहे.