सुप्रिया यांचं व्यवसायाचं परदेशातूनही कौतुक

लोखंडाच्या वस्तू बनवणं, फॅब्रिकेशन करणं, वेल्डींग, ग्रायडिंग करणं, ही तशी पुरूषी मक्तेदारी असलेली कामं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 8, 2018, 08:57 PM IST
सुप्रिया यांचं व्यवसायाचं परदेशातूनही कौतुक title=

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे  : लोखंडाच्या वस्तू बनवणं, फॅब्रिकेशन करणं, वेल्डींग, ग्रायडिंग करणं, ही तशी पुरूषी मक्तेदारी असलेली कामं. पण याला छेद दिलाय पुण्यातल्या सुप्रिया जगदाळे यांनी, त्यांच्या या व्यवसायाचं अगदी परदेशातूनही कौतुक होतंय. 

सगळं लीलया सांभाळणाऱ्या सुप्रिया

वेल्डिंगच्या ठिणग्या, कान बधीर करणारा ग्रायंडरचा आवाज. हे सगळं लीलया सांभाळणाऱ्या आहेत सुप्रिया जगदाळे. नोकरीत मन रमत नाही म्हणून सुप्रिया जगदाळे यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी चक्क फॅब्रिकेशनचा व्यवसाय निवडला.

फॅब्रिकेशनचं सुसज्ज वर्कशॉप

वडगाव धायरीत जगदाळे याचं समृध्दी इंडस्ट्रीज हे फॅब्रिकेशनचं सुसज्ज वर्कशॉप आहे. इथे सुप्रिया शाळेतली बाकं, बेड, झोपाळे अशा वस्तू तयार करतात.

राहूल या कारखान्याचं मार्केटिंग करतात

सुप्रिया जगदाळे यांचे पती राहूल या कारखान्याचं मार्केटिंग करतात. तर, वर्कशॉप मधलं वेल्डिंग, ग्रांयडिंग, पावडर कोटिंग, डिझायनिंग या कामांची जबाबदारी सुप्रिया यांची. गौरी गणपतीच्या वेळी आरास करण्यासाठी खास स्टँड त्यांनी तयार केला आहे, त्याला परदेशातूनही मागणी आहे. 

वर्कशॉप उभारायला मोठा आधार

सुप्रिया जगदाळे यांना हे वर्कशॉप उभारायला सगळ्यात मोठा आधार दिला तो त्यांच्या वडिलांनी. पंतप्रधान महिला रोजगार योजनेचीही त्यांना मदत झाली. आता संपूर्णपणे महिलांनी चालवलेला कारखाना उभारायचं त्यांचं स्वप्न आहे.