बुलढाणा : बुलढाण्यातील महावितरणच्या कार्यालयाचं वीज कनेक्शन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडलं. महावितरणकडून सक्तीनं वीज बिल वसुली सुरू आहे. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कार्यालयाचं वीज कनेक्शन तोडलं. दरम्यान शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन पुन्हा जोडल्याशिवाय अधीक्षक अभियंत्याला कर्यालयातून जाऊ देणार नसल्याची भूमिका यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतली.
आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले. शेतकऱ्यांना त्रास देणारी महावितरण शॉक दिल्याशिवाय सुधरणार नाही, असं देखील त्यांनी या वेळी म्हटलं.
शेतकऱ्यांचे कापलेले वीज कनेक्शन आजच पुन्हा जोडण्याची मागणी त्यांनी केली. स्वाभिमान आपल्या मागणीवर ठाम आहेत.