प्रताप नाईक, झी मीडीया, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले पोर्लेमधील श्री दत्त दालमीया साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. मागील थकीत उस बिल न दिल्यानं आणि प्रत्येक टनाला दोन किलो साखर मिळावी यासाठी शेतकरी आक्रमक झाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले पोर्ले परिसरात श्री. दत्त दालमिया साखर कारखाना आहे. सध्या हा कारखाना दालमिया या खाजगी व्यवस्थापनाकडे चलवण्यासाठी आहे. मात्र, दालमीया व्यवस्थापनानं हा साखर कारखाना चालवण्यासाठी घेतला तेव्हापासून शेतकरी आणि कारखाना प्रशासनामध्ये विविध मागण्यांना घेऊन संघर्ष सुरुच आहे.
दिवाळीनंतर साखरेचा हंगामा सुरु होणार असताना साखर कारखाना प्रशासनानं मागील वर्षाचं थकीत बिल अजूनही अदा केलेलं नाही. त्याचबरोबर अनेक वेळा शेतक-यांनी प्रत्येक टनामागे दोन किलो साखर मिळावी अशी मागणी केली होती. मात्र, कारखाना प्रशासनानं याकडे दर्लक्ष केलं. त्यामुळे शेतक-यांबरोबरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होऊन साखर कारखाना स्थळावरील मिटिंग हॉल, अकाऊंट ऑफीस, शेती ऑफीसवर हल्ला चढवला.
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अनेकवेळा साखर कारखाना प्रशासनाला जाब विचारला. मात्र, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद न देल्यामुळं आजची ही कृती शेतक-यांनी केली असं स्वाभीमानीच्या कार्यकर्त्याचं म्हणण आहे.
जोपर्यंत थकित बिलं दिलं जात नाही आणि टनामागं दोन किलो साखर मिळत नाही, तो पर्यंत पुढील गळीत हंगाम सुरु करु देणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतलीय.
दत्त दालमिया प्रशासनाला जाब विचारायला शेतकरी येणार याची कल्पना अधिकारी आणि कर्मचा-यांना होती. त्यामुळे त्यांनी शेतकरी येण्याआधीच कारखाना स्थळावरुन पळ काढला. त्यामुळे शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. किमान आता तरी कारखाना प्रशासनानं शेतक-यांच्या मागणीचा विचार करावा अन्यथा हा संघर्ष असाच सुरु राहु शकतो असं उस उत्पादक शेतक-याचं म्हणणं आहे.