स्वच्छ भारत अभियान स्पर्धा, चंद्रपूरची जोरदार मोर्चेबांधणी

चार लाख लोकसंख्येचं चंद्रपूर शहर स्वच्छता अभियानात अव्वल येण्यासाठी जीवाचं रान करत असल्याचं पहायला मिळत आहे. 

Updated: Dec 23, 2017, 01:27 PM IST
स्वच्छ भारत अभियान स्पर्धा, चंद्रपूरची जोरदार मोर्चेबांधणी title=

चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियान स्पर्धेला आता काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी उत्तम कामगिरी केलेल्या चंद्रपूर शहरानं यंदा अव्वल ठरण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी स्वच्छता संदेश दूतही निर्माण करण्यात आले असून, शिवाय पालिकेच्या या मोहिमेला गुण देण्यासाठी एक ऍपही तयार करण्यात आले आहे.

चार लाख लोकसंख्येचं चंद्रपूर शहर स्वच्छता अभियानात अव्वल येण्यासाठी जीवाचं रान करत असल्याचं पहायला मिळत आहे. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत एका ऍपद्वारे मनपाच्या स्वच्छता विषयक कामाला मनपा हद्दीतल्या नागरिकांनी गुण द्यायचे आहेत. याशिवाय स्वतंत्र यंत्रणेद्वारेही याचं मुल्यांकन केलं जाणारयं. खासगी कचरा आस्थापनेद्वारे गेली 5 वर्ष स्वच्छता कार्यक्रम उत्तम रित्या राबवला गेलाय. या कामांच्या परीक्षेची वेळ आता येऊन ठेपलीय. यात थेट नागरिकांना सहभागी करून घेण्यात आलं असून, उत्सुक नागरिकांना स्वच्छता संदेश दूत म्हणून मान्यता देण्यात आलीय.

स्वच्छता मिशन अंतर्गत केवळ कच-याचं व्यवस्थापनच केलं जातं असं नाही तर चौकात लॅंडस्केप, उद्यान निर्मिती, रामाळा तलावाला पर्यटन स्थळाचं स्वरुप देणं, नदीघाटांचा विकास आणि जुन्या सार्वजनिक शौचालयांच्या उन्नतीकरणासह नव्यांची निर्मितीही केली जातेय. तर, प्रदुषित शह अशी औळख पुसण्याचा प्रयत्न महापालिकेसोबतचं नागरिकही करताना दिसतायत.