काजवा महोत्सव पाहून घरी परतताना अपघात; एकाचा मृत्यू

भंडारदऱ्याजवळील मुतखेल रस्त्यावरून गाडी थेट दरीत कोसळली.

Updated: Jun 8, 2019, 08:37 PM IST
काजवा महोत्सव पाहून घरी परतताना अपघात; एकाचा मृत्यू title=

प्रशांत शर्मा, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या भंडारदारा परिसरात सध्या काजवे मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहेत. काजवा महोत्सव पाहून घराकडे परतत असताना स्विफ्ट गाडी भंडारदऱ्याजवळील मुतखेल रस्त्यावरून थेट दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गाडी कोसळून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सध्या काजवे पाहण्यासाठी पर्यटक भंडारदरा परिसरात मोठ्या संख्येने जात आहेत. रात्री उशिरापर्यंत अभयारण्य परिसरात थांबून घराकडे परतत असताना स्विफ्ट गाडीला अपघात झाला. संगमनेर तालुक्यातील पर्यटक आपल्या स्विफ्ट गाडीतून घरी परतत असताना भंडारदऱ्याजवळील मुतखेल रस्त्यावरून ही गाडी थेट दरीत कोसळली. यामध्ये एक जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले. 

शुक्रवारी रात्री बारा ते सव्वा बाराच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात संगमनेर येथील सचिन यशवंत जाधव याचे निधन झाले. तर दत्तात्रय शेणकर हा गंभीर जखमी, तर प्रवीण डाफेदार हा किरकोळ जखमी झाला आहे.