चंद्रपूर : चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एक धक्कादायक व्हिडीओ पुढे आलाय. ताडोबातील टुरिस्ट गाडयांना विशिष्ट क्रमांक दिले गेले आहेत. यातील खुटवंडा प्रवेशद्वारातून प्रवेश घेत असलेल्या एक KH -04 या जिप्सीच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.
जामणी परिसरात १० फेब्रुवारी रोजी या गाडीत पर्यटक बसून असताना जिप्सीचालकाने गाडी चालविण्याचे सोडून मोबाईलने शूट करण्यात वेळ घालविला. परिणामी वाघाने जिप्सी वाहनाला स्पर्श केला. ताडोबातील जिप्सीचालकांनी वन्यजीवांपासून विशिष्ट अंतर ठेवावे असा कडक नियम आहे.
याशिवाय पर्यटकांना माहिती देण्यासाठी सशुल्क गाईड्स देखील वाहनात असतात. असे असताना KH -04 या जिप्सीच्या चालकाने वाहन पुढे घेण्याऐवजी मोबाईल शूट घेण्याच्या प्रकारावर संताप व्यक्त होत आहे. ही क्लिप समाजमाध्यमांवर वायरल झाली असून या घटनेने ताडोबातील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे २ गाड्यांच्या चालकांनी आरडाओरडा करत, शिवीगाळ करत एकमेकांशी केलेली बातचीत देखील गंभीर मानली जात आहे. ताडोबा प्रशासन यावर कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या छोट्याश्या क्लीपमध्ये चालक-गाईड्सच्या नियमबाह्य वर्तणुकीमुळे भेदरलेले पर्यटक स्पष्ट दिसत आहेत.