गुन्हे मागे घेतले तरच मतदान, मराठा समाजाचा भाजपला इशारा

मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत, तर भाजपला मतदान करणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे.

Updated: Feb 17, 2019, 08:03 PM IST
गुन्हे मागे घेतले तरच मतदान, मराठा समाजाचा भाजपला इशारा

पंढरपूर : मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत, तर भाजपला मतदान करणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे. पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली. या बैठकीत मराठा आंदोलकांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत चर्चा झाली. सरकारनं लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदर गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राज्यातल्या १३ हजार ७९२ मराठा आंदोलकांवर वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे मागं घेण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चानं केली आहे.

मराठा समाजाने आरक्षण मिळावे या मागणी साठी राज्यभरात आंदोलन केले होते. आरक्षणासाठी आंदोलन होत असताना, काही ठिकाणी एसटी बसची तोडफोड झाली होती. तर काही ठिकाणी हिंसक वळण लागले होते. राज्यातील अशा घटनांमध्ये पोलिसांनी १३ हजार ७९२ जणांवर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी भाजप सरकारने मागे न घेतल्यास, राज्यातील मराठा समाज भाजपला मतदान करणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.

आंदोलनादरम्यान मराठा समाजातील ४२ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या कुटुंबियांना १० लाख रूपये आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिले होते. अदयाप भाजप सरकारने हे आश्वासन पूर्ण केले नाही, त्यामुळे मराठा क्रांती मोर्चानं नाराजी व्यक्त केली आहे. जर गुन्हे मागे घेतले, तर भाजपला मतदान करायलाही सांगू, असं सकल मराठा समाजातील प्रतिनिधींनी स्पष्ट केले.