अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याचा मृतदेह ताम्हिणी घाटात आढळून आलाय. विनायक शिरसाट असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. शिरसाट आठ दिवसापासून बेपत्ता होते. त्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल होती. शिरसाट यांनी काही अवैध बांधकामांविरोधात तक्रार केली होती, अशी माहिती मिळतेय.
माहिती अधिकाराच्या माध्यमातून काही प्रकरणं विनायक शिरसाट यांनी उघडकीस आणली होती. विशेष करून अवैध बांधकाम प्रकरणी त्यांनी मोहीमच उघडली होती. तसंच या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे प्रशासनाला कारवाई करणंही भाग पडलं होतं. आज त्यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत ताम्हिणी घाटात आढळून आल्यानं चर्चेला तोंड फुटलंय.
विनायक शिरसाट यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आलाय. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर तपासाला योग्य दिशा मिळू शकेल, अशी शक्यता आहे.
विनायक शिरसाट यांचा भाऊ किशोर शिरसाट यांना कपडे आणि मोबाईल फोनवरून विनायक यांच्या मृतदेहाची ओळख पटली. शिरसाट मृत्यू प्रकरणाचा योग्य तपास व्हावा आणि दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होतेय.