close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सुरेश प्रभू रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

युती झाली नाही तर चौरंगी लढत पाहायला मिळणार.

Updated: Feb 12, 2019, 11:22 AM IST
सुरेश प्रभू रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार

रत्नागिरी : केंद्रीय वाणिज्य आणि नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता युती झाली नाही तर चौरंगी लढत होणार असल्याचं चित्र निर्माण झाल आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरेश प्रभू हे या मतदारसंघात सक्रिय झाल्याचं पहायला मिळतं आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या पदाधिका-यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून सुरेश प्रभू यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली होती. तसंच पदाधिका-यांना याबाबत हिरवा कंदीलदेखील मिळाल्याचं पदाधिकारी खासगीत सांगत आहेत. त्यामुळे भाजप या मतदारसंघात जोरदार कामाला लागली असून सुरेश प्रभूच भाजपचे उमेदवार असतील असंही भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी खासगीत सांगत आहेत.

सगळेच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागले आहेत. सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. कोकणचा बालेकिल्ला राखण्यासाठी शिवसेनेपुढे मोठं आव्हान असेल. जर युती झाली नाही तर शिवसेनेकडून विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे मैदानात असतील. तर भाजपकडून आता सुरेश प्रभू यांचं नाव पुढे येत असल्याने येथे रंगतदार निवडणूक होणार आहे.

2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दीड लाखांहून अधिकच्या फरकाने काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या निलेश राणे यांचा पराभव केला होता. येथे नारायण राणे यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे.