तारकर्ली बोट अपघात! जुन्नरचे प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पिसे यांचा दुर्देवी मृत्यू

डॉ.  स्वप्निल पिसे हे आपल्या कुटुंबासह तारकर्लीला स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी गेले होते

Updated: May 24, 2022, 07:18 PM IST
तारकर्ली बोट अपघात! जुन्नरचे प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पिसे यांचा दुर्देवी मृत्यू title=

हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर : मालवणमधल्या तारकर्लीत (Tarkarli, Malvan) पर्यटक बोट बुडाल्याची दुर्देवी घटना घडली. (Boat Accident) यात दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला तर दोंघांची प्रकृती गंभीर आहे. बोटीत एकूण 20 पर्यटक होते. सुदैवाने 16 पर्यटक सुखरूप वाचवण्यात आलं. 

मृतांमध्ये जुन्नरमधील डॉक्टर
जुन्नर तालुक्यातील आळेफाटा इथले प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील मारुती पिसे यांचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. डॉ. स्वप्नील पिसे आपल्या कुटुंबियांसह मालवणमधील तारकर्ली इथं पर्यटनासाठी गेले होते. मंगळवारी सकाळी तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावरून 20 जणांना घेऊन बोट स्कुबा ड्रायव्हिंगसाठी गेली होती. 

स्कुबा डायव्हिंगही व्यवस्थित पार पडले. मात्र,तेथून परत येताना घात झाला आणि ही बोट समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच अचानक उलटली. बोट उलटल्यानंतर पर्यटकांना वाचावण्यासाठी मदतकार्य सुरु झाले. या सर्वांना समुद्रातून बाहेर काढेपर्यंत डॉ. स्वप्नील पिसे यांचा मृत्यू झाला. डॉ. स्वप्निल पिसे यांच्या कुटुंबियांवर मालवण इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शांत, मनमिळावू स्वभावाचे डॉक्टर
गेल्या दहा वर्षांपासून डॉ. स्वप्निल पिसे हे पुणे-नाशिक महामार्गावरली आळेफाटा इथं हॉस्पीटल चालवत होते. शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे ते परिसरात परिचीत होते. त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ. स्वप्निल पिसे यांच्या पश्च्यात पत्नी आणि एक मुलगी आहे.