रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला 24 तास उलटण्याआधीच खात्यावर जमा झाला दिवाळी बोनस; कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर

Tata Motors Credits Diwali Bonus To Workers Accounts: टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर 24 तास उलटण्याआधीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दिवाळी बोनसची रक्कम जमा झाली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 12, 2024, 09:46 AM IST
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला 24 तास उलटण्याआधीच खात्यावर जमा झाला दिवाळी बोनस; कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर
शुक्रवारी खात्यावर जमा झाली रक्कम (फाइल फोटो, सौजन्य - पीटीआय)

Tata Motors Credits Diwali Bonus To Workers Accounts: देशातील सर्वात मोठा उद्योग समुह असलेल्या टाटा ग्रुप्सचे आधारवड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटांचे बुधवारी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात वयाच्या 83 व्या वर्षी निधन झालं. गुरुवारी शासकीय इतमामात आणि अनेक अती महत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. ओलावलेल्या डोळ्यांनी सर्वांनीच रतन टाटांना अखेरचा निरोप दिला. कायमच आर्थिक नफ्यापेक्षा माणसं जपण्यास प्राधान्य देणाऱ्या रतन टाटांच्या पश्चात त्यांच्या उद्योग समुहाकडूनही त्यांचाच कित्ता गिरवला जात असल्याचं मूर्तीमंत उदाहरण शुक्रवारी पाहायला मिळालं. रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन 24 तास उलटण्याआधीच कंपनीने कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दिवाळी बोनसचे पैसे जमा केले. टाटा मोटर्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा बोनस देण्यात आला आहे. टाटा समुहावर रतन टाटांच्या जाण्याने दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही कर्मचाऱ्यांची आडनिड होऊ नये म्हणून आपलं दु:ख बाजूला सारत टाटा मोटर्सने घेतलेल्या या निर्णयाचं सर्वच स्तरारुन कौतुक होताना दिसतंय.

Add Zee News as a Preferred Source

49 हजार रुपये बोनस खात्यावर जमा

रतन टाटांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरामध्ये बुडालेला असताना कंपनीने मात्र दिवाळी बोनस अगदी वेळेत दिल्याने टाटा मोटर्सचे कर्मचारी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. टाटांच्या निधानाने कर्मचारीवर्गही दु:खी असून दिवाळीच्या बोनसबद्दल या साऱ्यादरम्यान कोणतीही चर्चा नव्हती. मात्र दिवाळीचा सण अवघ्या 15 दिवसांवर आलेला असल्याने पिंपरीमधील टाटा मोटर्सच्या व्यवस्थापनाने 10 हजार कामगारांच्या बँक खात्यामध्ये दिवाळी बोनस म्हणून प्रत्येकी 49 हजार रुपये जमा केले आहेत. जे कर्मचारी कायमस्वरुपी म्हणजेच पर्मनंट आहेत त्यांना हा इतका बोनस देण्यात आला आहे. टाटा मोटर्समध्ये 30 हजार कंत्राटी कामगारही कार्यरत आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही त्यांच्याबरोबर झालेल्या करारानुसार बोनस देण्यात आला आहे. 

कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणतात...

कामगार संघटनेचे अध्यक्ष शिशूपाल तोमर यांनी कर्मचाऱ्यांचा खात्यावर दिवाळी बोनस जमा झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. 'आमच्या कंपनीच्या मालकांच्या अंत्यसंस्काराला 24 तास पूर्ण होण्याआधीच व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दिवाळी बोनसची रक्कम जमा केली. या अशा दु:खद प्रसंगातही कंपनीने आम्हाला बोनस दिल्याने अनेक कर्मचारी भारावून गेले आहेत,' असं तोमर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं. अनेक कर्मचाऱ्यांना पैसे खात्यावर जमा झाल्याचा मेसेज पाहून अश्रू अनावर झाले.

पहिल्यांदाच त्या परंपरेत पडला खंड

दरम्यान, दुसरीकडे पिंपरीमधील टाटा कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच खंडेनवमीच्या पूजेमध्ये खंड पडला आहे. सर्व कामगारांनी गुरुवारी एकत्र येत रतन टाटांना यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More